चिपळूण
मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर शनिवारी तालुक्यातील गणेशखिंड मार्गावर लावलेल्या सापळय़ात तिघेजण सापडले. या प्रकरणी तिघांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून यासाठी वापरण्यात आलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
महादेव जयराम महाडिक, अनिल तुकाराम कदम (दोघे-शिरवली, चिपळूण), रिक्षाचालक लक्ष्मण हिरु चाळके (काविळतळी, चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गणेशखिंड ते रामपूर या मार्गावर मांडूळ जातीचे साप वरील तिघेजण रिक्षातून घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱयांनी या मार्गावर सापळा रचून एका संशयास्पद रिक्षाची तपासणी केल्यानंतर हा मांडूळ जातीच्या सापाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला.
ही कारवाई विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर, परिमंडळ वनाधिकारी दौलत भोसले, गुहागर परिमंडळ वनाधिकारी संतोष परशेटय़े, वनरक्षक यशवंत सावर्डेकर, अरविंद मांडवकर, संजय दुंडगे आदींच्या पथकाने केली. या प्रकरणी वरील तिघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तस्करीसाठी वापरण्यात आलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, वनविभागाने या प्रकरणी तिघांची चौकशी सुरु केली असली तरी मांडूळ साप कोठून आणला व कोणी पकडला तसेच यात आणखी कितीजण सहभागी आहेत, असे अनेक प्रश्न पुढे येऊ लागले आहेत.