गस्तीतील पोलिसांची कारवाई, स्क्रू ड्रायव्हरसह, कटर, बॅटरी जप्त, महिन्याची शिक्षा
चिपळूण : शहरातील गोवळकोट कमानीच्या ठिकाणी एका टपारीच्या आडोशाला संशयीतरित्या उभ्या असलेल्या एका वयोवृध्द सराईत चोरटय़ास गस्तीवरच्या पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री रंगेहात पकडले. त्याच्याकडून चोरी करण्याची हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
शंकर नवलप्पा पवार उर्फ कांबळे (58, हिरज, उत्तर सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गोवळकोट कमानीच्या ठिकाणी डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस नाईक संतोष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष भालेकर, पंकज पडेलकर, पोलीस शिपाई प्रमोद कदम आदी गस्तीवर असताना त्यांना कमानीच्या ठिकाणी एका टपरीच्या आडोशाला एक व्यक्ती लपलेल्या स्थितीत संशयास्पदरित्या हालचाली करताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्याला आवाज दिला असता त्याने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडले.
पोलिसांनी त्याला अधिक माहिती विचारली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्याकडे घरफोडी करण्यासाठीचे 2 मोठे स्क्रू ड्रायव्हर, ऍडजस्टमेंट पाना, टेस्टर, बॅटरी, कटर आदी हत्यारे आढळून आली. ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. दरम्यान, शंकर पवार यास गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 1 महिना 2 दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली, अधिक तपास पोलीस नाईक संतोष शिंदे व पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत.