चिपळूण
तालुक्यात धुवाँधार झालेल्या पावसामुळे रविवारी शहरातील सांस्कृतिक केंद्राच्या प्रवेशद्वारावरच जुनाट वृक्ष कोसळला. यामुळे प्रवेशद्वाराचा एक कोपरा ढासळला आहे. या सांस्कृतिक केंदाच्या उद्घाटनाआधीच कोसळलेल्या वृक्षामुळे उद्घाटन सोहळा आणखी लांबणीवर टाकण्यास नगरपरिषदेला निमित्तच मिळाले आहे.
कोसळलेला हा वृक्ष नगर परिषदेने बाजूला केला असून या वृक्षामुळे सांस्कृतिक केंद्राला नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, शनिवारच्या पावसामुळे शहरातील डीबीजे महाविद्यालय व बहाद्दूरशेखनाका परिसरातील गटारालगत निर्माण झालेला चिखल रविवारी पावसाचा जोर ओसरल्यानंतर सकाळी पालिकेसह महामार्ग ठेकेदाराकडून बाजूला करून स्वच्छता करण्यात आली. मात्र हा चिखल पालिकेच्या गाडीत भरुन महामार्गालगतच ढिग मारुन ओतण्यात आला. मात्र पाऊस पडल्यानंतर हा चिखल पुन्हा महामार्गावर येऊन चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार आहे.
तसेच शनिवारच्या पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात पालवण येथील मारुती सावर्डेकर यांच्या घराचा अर्धा भाग कोसळला आहे, तर कामथे येथील सरस्वती कदम यांच्या घराचे नुकसान झाले आहे. शिवाय शनिवारी चिवेली येथे रस्त्यावर कोसळलेली दरड हटवण्यात आली. कळकवणे परिसरात सर्वाधिक पाऊस कोसळला असून असुर्डेत त्याचे प्रमाण कमी आहे. या पावसाने 1263.61 मि. मि. इतकी सरासरी गाठली आहे. दरम्यान, रविवारी या पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून केवळ हलक्या सरी कोसळत होत्या.