चिपळूण
शहरातील बेंदरकर आळीतील देवरुखकर ज्वेलर्सचे मालक सुभाष देवरुखकर यांचा मुलगा, सुवर्णकार सचिन देवरुखकर (35) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट झाले नसले तरी मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.
चिपळूणसह मुंबई, पुणे आदी शहरात देवरुखकर ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन सचिनने आपल्या सराफी व्यवसायात पदार्पण केले होते. सचिन शुक्रवारी दुपारी जेवणानंतर बेडरुममध्ये झोपला होता. त्याची आई त्याला चहा देण्यासाठी बेडरुमपर्यंत गेली व तिने सचिनला बाहेरुन हाक मारली. मात्र सचिनने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने वडील सुभाष यांना बोलावून घेतले. त्यांनी दरवाजा तोडून बेडरुममध्ये प्रवेश केला. यावेळी सचिनने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सचिनने आत्महत्या करण्याचे कारण पुढे आले नसले तरी काही दिवसांपासून त्याच्या वागण्या व बोलण्यात फरक पडला होता. त्याला शोभिवंत मासे पाळण्याची आवड होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने सर्व मासे विकले होते. सचिनचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी सुभाष यांच्या आईचे निधन झालेले असतानाच सचिनच्या अशा प्रकारच्या मृत्यूमुळे देवरुखकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे