कामथे रूग्णालयातील घटनेने खळबळ
प्रतिनिधी/ चिपळूण
कामथे रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या 45 वर्षीय प्रौढाने रविवारी स्वातंत्र्यदिनीच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तो खेड तालुक्यातील आंबडस येथील आहे. रविवारी नव्या 27 रूग्णांच्या भरीमुळे तालुक्याचा आकडा 790 वर गेला आहे.
कोरोनाला आळा बसावा म्हणून प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. शहरातील गोवळकोट येथे फ्ल्यू क्लिनिक सेंटर आणि सावर्डे व वालोपे रेल्वेस्थानकांमध्ये चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणी व नोंदणीसाठी कक्ष सुरू करण्यात आले असून येथे 10 पथके तैनात करण्यात आली आहेत. जयवंत किसन वारणकर (45) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने 6 ऑगस्ट रोजी कामथे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना रविवारी मध्यरात्री रूग्णालयाच्या टेरेसवर जाऊन त्याने शेडच्या ऍंगलला बेडशिटने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. हा प्रकार लक्षात येताच रूग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, तहसीलदार जयराज सूर्यवेशी यांनी रूग्णालयाला भेट दिली. कोरोनाच्या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या बाबत पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास हे. कॉ. सुभाष भुवड करीत आहेत.
गणेशोत्सवासाठी रेल्वेने येणाऱया चाकरमान्यांच्या स्वागतासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी वालोपे व सावर्डे रेल्वेस्थानकांवर त्यांची आरोग्य तपासणी व नोंदणी करण्यासाठी कक्ष तयार करण्यात आले असून येथे 10 पथके ठेवण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून चाकरमान्यांच्या हातावर होमक्वारंटाईनचे शिक्के मारले जाणार असून दुर्धर आाजार असणाऱयांची ऍन्टीजेन चाचणी केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सूर्यवंशी यांनी दिली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त गोवळकोट एज्युकेशन सोसायटी पुरस्कृत गोवळकोट उर्दू शाळेत फ्ल्यू क्लिनिकचा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. गोवळकोट अमन कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, लाईफ केअर हॉस्पिटल यांच्या सौजन्याने या क्लिनिकमध्ये दर रविवारी व सोमवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत डॉ. सर्फराज गोठे, डॉ. इसाक खतीब, डॉ. शाहीद परदेशी, डॉ. इलियास अत्तार, डॉ. अश्फाक परकार हे सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असणाऱया रूग्णांची तपासणी करणार आहेत. या क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, नाझीम अफवारे उपस्थित होते.