यंदाच्या बॅचची कोकणातील एकमेव महिला वैमानिक
चिपळूण/ प्रतिनिधी
वैमानिक तयार करणाऱया बॉम्बे फ्लाईंग क्लबमध्ये सहा-सहा वर्षे प्रशिक्षण घेऊनही अनेकांचे वैमानिक बनण्याचे स्वप्न अधुरे राहते. मात्र चिपळूणची सुकन्या निधी भोसले हिने अवघ्या दीड वर्षात हे स्वप्न साकारले आहे. विसाव्या वर्षी वैमानिक बनलेली निधी ही बॉम्बे फ्लाईंग क्लबमधून निवड झालेल्या यावर्षीच्या तुकडीतील कोकणातील एकमेव महिला वैमानिक आहे.
निधी ही माजी नगराध्यक्ष स्व. सदाशिव भोसले यांची नात, तर विद्यमान नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांची भाची आहे. चिपळूण बाजारपेठेतील यशस्वी व्यावसायिक मंगेश भोसले यांची ती कन्या. निधीचे प्राथमिक शिक्षण हे ख्रिस्तज्योती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, तर बारावीपर्यतचे शिक्षण डीबीजे महाविद्यालयात झाले. त्यानंतर 2018मध्ये तिने बॉम्बे फ्लाईंग क्लबमध्ये बीएस्सी आणि कमर्शियल पायलट ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला. कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळवण्यासाठी 200 तास विमान चालवावे लागते. त्याचबरोबर सहा पेपरही सोडवावे लागतात. बॉम्बे फ्लाईंगमध्ये देशभरातील हजारो तरूण वैमानिक बनण्याची स्वप्ने घेऊन येतात. कोणी अभियांत्रिकीची पदवी घेऊन, तर कोणी अन्य शाखेच्या पदव्या घेऊन येतात. पाच ते सहा वर्षे प्रशिक्षण घेऊनसुध्दा अनेकांना वैमानिक होता येत नाही. मात्र निधीने पहिल्या दीड वर्षातच आपले कर्तृत्व सिध्द करून दाखवले. वयाच्या विसाव्या वर्षीच 200 तास विमान चालवत आणि आवश्यक सहाही पेपर पहिल्या फेरीत सोडवणारी निधी ही पहिलीच विद्यार्थिनी आहे.
निधीने पहिले एक वर्ष 2 महिने धुळे येथे सिंगल इंजिन विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. मल्टी इंजिन चालवण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्रात नसल्याने तिने हैद्राबाद येथे 22 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. निधीची गुणवत्ता पाहून तिला दोन कंपन्यांकडून नोकरीची ऑफर आली आहे. मात्र तिला एअर लायसन्समध्येच करिअर करायचे असल्याचे तिने सांगितले. पायलट बनण्यासाठी साधारण तीस लाख खर्च येतो. निधीने बॉम्बे फ्लाईंग क्लबमधील गुणवत्ता आणि पायलट होण्यासाठीचे पेपर पहिल्या फेरीतच चांगल्या गुणानी सोडवल्याने टाटा ट्रस्टने तिला दहा लाखाची शिष्यवृत्तीही दिली आहे.
लहानपणापासून बाळगलेले स्वप्न साकार
वैमानिक बनण्याचे स्वप्न आपण लहानपणापासूनच बाळगले होते. आजोबांकडून मला प्रेरणा मिळाली होती. आई-बाबांनी पाठिंबा दिला. या प्रशिक्षणासाठी मानसिक व शारीरिकदृष्टय़ा तंदुरूस्त असावे लागते. लहानपणापासून बाळगलेले स्वप्न आज साकार झाले याचा मनस्वी आनंद होत असल्याचे निधीने सांगितले.