इस्त्रोच्या सायंटिस्ट इंजिनिअरपदी निवड, जिल्हय़ाच्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रतिनिधी/ चिपळूण
अंतराळ संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असणाऱया इंडियन स्पेस रिसर्च असोसिएशन म्हणजेच ‘इस्त्रो’ संस्थेच्या सायंटिस्ट इंजिनिअर या पदावर चिपळूणचा सुपूत्र ऋतुराज जगताप याची निवड झाली आहे. करंबवणेसारख्या ग्रामीण भागातून जागतिकस्तरावर ‘अंतराळ’ झेप घेणाऱया ऋतुराजने चिपळूणच्याच नव्हे तर जिल्हय़ाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ऋतुराज याचे मुळ गाव सांगली जिल्हय़ातील बुधगाव. वडील गेली 31 वर्षे चिपळूण तालुक्यातील करंबवणे येथील हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. ऋतुराज याने ग्रामीण भागातील करंबवणे येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाला. ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षणाची शिदोरी घेऊन चिपळूणसारख्या लहानशा शहरात आलेला हा विद्यार्थी येथेही आपली चमक सोडून गेला. या प्रशालेत त्याने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. 2008 च्या दहावी बॅचचा हा अत्यंत शांत, संयमी, गुणी आणि हुशार विद्यार्थी त्याच्या चौकस बुद्धीमुळे भविष्यात काहीतरी ‘़मोठे’ करणार याची चाहूल शिक्षकांना होतीच. विद्यार्थीदशेतील त्याच्या ‘शंकेखोर’ स्वभावातच भविष्यातील शास्त्रज्ञ दडला होता.
बालपणापासूनच ऋतुराजला संशोधनाची आवड होती. संशोधन करणाऱया एखाद्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळावी, हे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने त्याच्या शैक्षणिक वाटचालीत मेहनतींची कोणतीही कसर सोडली नाही. 2008मध्ये तो युनायटेड इंग्लिश स्कूलमधून चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाला. यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण शहरातीलच डीबीजे महाविद्यालयात पूर्ण केले. पदवी शिक्षणासाठीही मुंबई-पुण्याची वाट न धरता त्याने रत्नागिरी येथील फिनोलेक्स कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली.
शिक्षणासाठी त्याची फरफट झाली तरी त्याने शिक्षणाची कास कधीच सोडली नाही. आई-वडील शिक्षक असल्याने त्यांच्याकडून आपोआपच त्याला शिक्षणाचा वसा मिळाला होता. यामुळे आपल्या शैक्षणिक कालखंडात उत्तम गुणांची साथ न सोडल्याने पदवीपश्चात त्याला चांगल्या ‘ऑफर’ही येऊ लागल्या. सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातून एमटेक होताच चेन्नई येथील एल ऍण्ड टी कंपनीने त्याला नोकरीची ऑफर दिली. या कंपनीमध्ये तो इंजिनिअर म्हणून रूजू झाला.
अवघ्या 27व्या वर्षी अंतराळ झेप
चेन्नई येथे नोकरी सांभाळत असतानाच त्याने इस्त्रोची एन्ट्रान्स व मुलाखतीची तयारी सुग्नरू केली होती. यातूनच त्याची अवघ्या 27 व्या वर्षी इस्त्रोच्या सायंटिस्ट इंजिनिअर पदासाठी निवड झाली. 30 जून रोजी तो तिरूअनंतपुरम येथील इस्त्रो संस्थेत रूजू झाला आहे. चिपळूणच्या सुपुत्राने मारलेली ही झेप आज तालुकावासियांची मान अभिनाने उंचावत असून जिल्हावासियांसाठीही हा एक आनंदाचा क्षण ठरत आहे.
प्रतिक्रिया
ऋतुराज भविष्यात यशस्वी वाटचाल करेल
ऋतुराजच्या यशाचे श्रेय त्याच्या मेहनतीला तर आहेच, पण त्याचबरोबर त्याच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाची साथ देणाऱया गुरूजन व मित्रपरिवारालाही आहे. या सर्वांमुळे नेहमी त्याला कणखर परिस्थितीतून बाहेर पडण्याचे बळ मिळाले. या बळावरच तो भविष्यात यशस्वी वाटचाल करेल.
– बी. वाय. जगताप ( ऋतुराजचे वडील)
ग्रामीण भागातील शिक्षणाचा‘बेस’
एकीकडे सध्या इंग्रजी शिक्षणाचे पेव असताना ग्रामीण भागातील शिक्षणाच्या ‘बेस’चे महत्व वेळोवेळी अधोरेखित होत आहे. ग्रामीण भागातूनच कॉन्व्हेंट व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा ओढा वाढत असताना आज अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवरील महत्वाची पदे ‘मातृ’भाषेतून शिक्षण घेतलेली मंडळी भूषवताना दिसत आहेत. ऋतुराजची कामगिरी अजून तेवढी मोठी नसली तरी ग्रामीण भागातून मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला मुलगाही जागतिक पातळीरील कंपनीत स्थान मिळवू शकतो, हे त्याने सिद्ध केले आहे. त्यामुळे ऋतुराजचे यश ‘मराठी’ माध्यमातून शिकणाऱया अनेक होतकरू विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड ठरू शकते.