प्रतिनिधी / चिपळूण
भक्षाचा पाठलाग करत विहीरीत पडलेल्या बिबटयाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ढोक्रवली येथे घडली. दरम्यान बिबटयांसह वन्यप्राण्यांच्या मृत्यूंचे प्रमाण तालूक्यात वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
ढोक्रवली सुतारवाडी येथील मनोहर राजाराम महाडीक यांच्या मालकीच्या विहीरीवर गुरूवारी सकाळी विज मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्याना बिबटया पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबतची माहिती सावर्डे येथील वनविभागाला कळवल्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेश्री किर, वनसंरक्षक रानबा बंबर्गेकर यानी घटनास्थळी जाऊन मृत बिबटयाला ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर त्याला पिंपळी येथील वनविभागाच्या रोपवाटीकेत आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ एस.जी. नरळे यानी शवविच्छेदन केले. साधारण साडेतीन वर्षाचा आणि पूर्ण वाढ झालेला नर जातीचा मृत बिबटया होता.