अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱयांचे मुख्याधिकाऱयांना आदेश
प्रतिनिधी/ चिपळूण
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी नगर परिषदेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार नगरसेवक अविनाश केळसकर यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी अनेक कामांमध्ये मनमानी व हस्तक्षेप त्यांचा आरोप आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱयांनी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
केळसकर यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, 2016 साली खेराडे थेट नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. मात्र त्यांनी वेळोवेळी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत मनमानी करून जनतेच्या व सरकारच्या पैशाचा बेकायदेशीर खर्च करून अपहार केला आहे. त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कामांमध्ये शहरातील भुयारी गटार योजना, एलईडी स्ट्रीट लाईट, मार्कंडी येथील भागवत घर ते पवन तलावामागील गटार, खेंड येथील संसारे घरामागील खासगी जागेत बांधलेली संरक्षक भिंत, स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी 58/2चा वापर, भेडींनाका येथील गटार, गोवळकोट रोड ते गोवळकोट तिठा भागातील रस्ते, बाजार रस्ता, कानसेवाडी खेंड ते नाथ पै चौक, अलवारे बिल्डींग, ग्रीनपार्क ते खेराडे संकुल, गुहागरनाका ते भाटकर मोहल्ला, रेल्वे स्टेशन ब्रिज, शंकरवाडी ते बहादूरशेखनाका, जिप्सी कॉर्नर ते शंकरवाडी चौक, अभिषेक हॉटेल कमान, हायवे प्रभात रोड, स्वागत हॉटेल, एसटी बसस्थानक, रस्ते हॉटमिक्स करणे, प्रभाग 11 मधील रस्ते डांबरीकरण करणे, रिटेनिंग वॉल बांधणे, नगर परिषदेच्या विशेष निधीतून शहरामध्ये एलईडी स्ट्रीट लाईट बसवणे, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे नमूद केले आहे.
अधिकाऱयांवर दबाव टाकून त्यांनी बेकायदेशीर कामे करण्यास भाग पाडले. तसेच मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यासाठी 58/2चा गैरव<ापर केला आहे. यात नगर परिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या तक्रारीमुळे नगर परिषदेतील कागदपत्रांमध्ये फेरफार किंवा ती गहाळ करण्याची दाट शक्यता असून ही कागदपत्रे तातडीने ताब्यात घ्यावीत व याच्या चौकशीसाठी शासनाच्या तज्ञ अधिकाऱयांची नेमणूक करावी, बेकायदेशीर रक्कम खर्च करण्यात दोषी असणाऱयांकडून त्याची वसुली करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही केळसकर यांनी केली आहे.
नगरसेवक केळसकर यांच्या या तक्रारीची जिल्हाधिकाऱयांनी दखल घेतली असून या तक्रार अर्जाबाबत मुद्देनिहाय अहवाल व अभिप्राय कार्यालयाकडे पाठवण्याचे आदेश त्यांनी मुख्याधिकाऱयांना दिले आहेत. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी नगराध्यक्षा खेराडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.