चिपळूण
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या विरेश्वर तलावात भल्या मोठय़ा मगरीचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. यामुळे या तलावाच्या सभोवती सकाळ व सायंकाळी फेरफटका मारणाऱया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या विरेश्वर तलावाचे काही वर्षापूर्वी सुशोभिकरण करण्यात आल्यानंतर शहराच्यादृष्टीने एक पर्यटन स्थळ म्हणून हा तलाव नावारुपाला आला आहे. सध्यस्थितीत देखभाल व दुरुस्तीअभावी या तलावाला भकास स्वरुप आले असून सर्वत्र पडझड झाली आहे. असे असतानादेखील सकाळी व सायंकाळी या तलावासभोवती फेरफटका मारण्यासाठी अनेक नागरिक येत असतात. दोन वर्षांपूर्वी या तलावात मगरीचा वावर होता. यामुळे येथे फिरण्यास येणाऱया नागरिकांत भीतीचे वातावरण होते. या बाबत नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर या मगरीला काही तरूणांच्या मदतीने पकडून तिला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले होते. मात्र यावर्षी पहिल्याच पावसात या तलावात पाणी भरल्यानंतर पुन्हा महाकाय मगरीचे नागरिकांना दर्शन झाले आहे. यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. ही मगर पाण्यावर आल्यानंतर हौशी नागरिक आपल्या मोबाईलमध्ये तिला कैद करण्यासाठी पुढे सरसावत असल्याचे चित्र आहे.