प्रतिनिधी/ सातारा
चिमणपुरा पेठेतल्या सेंट्रीग काम करणाऱया युवकास सात दिवसांपूर्वी कोरोना असल्याचे समजले. त्याला जरा त्रास जाणवत असल्याने टेस्ट केली अन् त्या टेस्टमध्ये तो पॉझिटीव्ह आला. त्याची माहिती पालिकेला मिळताच पालिकेने त्याच्या घराचा परिसर सॅनिटायझर करुन घेतला. मात्र हा युवक व त्याची पत्नी सगळय़ा शहरभर गरागरा फिरते. अगदी भाजी आणायला मंडईकडे जातो. गारेच्या गणपती मंदिर परिसरात भटकतो. पालिकेच्या पथकाला पत्ता देवूनही तो युवक सापडेना अशी गत झाली आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या कशी वाढते हे सर्व सातारकर पहात आहेत. दररोज नव्या आकडय़ाची भर पडत आहे. सातारा शहरात कोरोनाची साखळी तुटेना त्याची एकेक कारणे समोर येवू लागली आहेत. त्यातील एक कारण नुकतेच तरुण भारतच्या हाती लागले आहे. ते म्हणजे चिमणपूरा पेठेतला सेंट्रीग काम करणाऱया 30 वर्षीय युवकास कोरानाची लागण झाली. हा युवक त्याच्या पत्नीसह एकटाच राहतो. त्याच्या घरात विलिनीकरणाची सोय आहे. तो बाधित आढळून आल्यानंतर
पालिकेने त्याच्या घराच्या परिसरात सॅनिटायझर फवारणी केली. तो घरातच उपचार घेत आहे. स्वतःच घरातील साहित्य आणायला बाहेर जातो. गारेच्या गणपती परिसरात हुंदडत असतो. नागरिकही वचकून त्याच्यापासून लांब राहतात. उगच आपल्याला कोरोना होईल या भितीने त्याच्यापासून लांब असतात. तो मात्र, बिनधास्तपणे मला कोरोना झाला आहे पण काहीच झाले नाही असे सांगत फिरतो. त्याच्या या वागण्याबाबत अनेकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. तरुण भारतकडेही काही नागरिकांनी माहिती दिली. तरुण भारतने पालिकेच्या पथकाला याची माहिती दिली. अतिक्रमण विभागाच्या पथकास पत्ता देवूनही तो सापडला नाही असे सांगत तिकडे जाणेच टाळले. त्यामुळे अशा नागरिकांच्या वागण्यामुळे कोरोना वाढत असल्याचे समोर येत असून पालिका प्रशासनाने अशा बाधित रुग्णांना किमान पॉझिटीव्हपासून मुक्ततेपर्यत येईपर्यत सक्ती करण्यात यावी, अशा उपाययोजनांची मागणी होत आहे.