ऑनलाईन टीम / मुंबई
केंद्र सरकार आणि मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर यांच्यात सुरू असलेला वाद काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आता नवे डिजिटल नियम तातडीने लागू करा, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा निर्वाणीचा इशारा केंद्र सरकारने ट्विटरला दिला आहे. या सगळ्या घटनाक्रमावर गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरचा लोगो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये भगव्या रंगामध्ये ट्विटरचा ‘लोगो’ दाखवत “चिमणी गिधाडांना भारी पडली,” असं म्हणत आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यासाठी नवी नियम लागू केले आहेत. केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. या नियमावरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या संघर्ष झाल्याचंही बघायला मिळालं. ट्विटरला यासंबंधी वारंवार सूचना देवूनही ट्विटरने नियम पालनास नकार दर्शवला. त्यामुळे केंद्राने ट्विटरला निर्वाणीचा इशारा देत अखेरची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटरमधील संघर्ष विकोपाला गेला आहे.