कागलमध्ये रोगमुक्त बालकांचा सत्कार सोहळा उत्साहात
कोल्हापूर/प्रतिनिधी
आयुष्याच्या सुरुवातीलाच हृदयरोगासह दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच लोपलेले असते. आजारामुळे बाल जीवाला लागलेल्या घरघरीमुळे संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य हरवते. यशस्वी शस्त्रक्रिया होऊन रोगमुक्त झालेल्या या चिमुकल्यांच्या चेहर्यावरील त्याचा मनाला मोठा आनंद आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. छोट्या-छोट्या चिमुकल्यांच्या रोगमुक्तीच्या या सेवेचे फार मोठे आत्मिक समाधान मिळते, असेही ते म्हणाले.
कोरोना संसर्गाच्या महामारीत लॉकडाऊन व कर्फ्यूमुळे राज्यातील मोफत वैद्यकीय उपचारांची सेवा बंद झाली होती. अलीकडेच ती सुरू झाल्यानंतर लहान मुलांवरील गंभीर आजारांच्या दीडशेहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वरित्या पार पडल्या आहेत. त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी रोगमुक्त चिमुकल्यांचा सत्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माणिक रमेश माळी होत्या.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, विशेष सहाय्य मंत्री असताना दवाखान्यांच्या धर्मदाय ट्रस्ट कायद्यामध्ये सुधारणा केली. गोरगरिबांवर दहा टक्के मोफत उपचार न करणाऱ्या दवाखान्यांच्या मालकांना सहा महिने शिक्षेची तरतूद केली. त्यामुळेच दुर्धर आजाराच्या गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवेची मोठमोठ्या दवाखान्याची दारे खुली झाली.
मंत्री मुश्रीफ यांचा आठ वर्षाचा नातू कु. उसेद याच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. तो म्हणाला, गोरगरीब आणि संकटग्रस्तांच्या सेवेमुळे माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावर सातत्याने हास्य आणि आनंद दिसतो. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत केलेल्या अफाट समाज कार्याबरोबरच हजारो जणांना दिलेल्या जीवदानाच्या पुण्याईची शिदोरी मुश्रीफांच्या पाठीशी आहे.
शाहूराजा आणि लोकराजा
प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, जनतेसाठी स्वतःचा खजिना रिकामा करणारा राजा म्हणजे शाहूराजा होय. शाहू महाराजांचा वारसा जपत जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी अहोरात्र झटणारा दुसरा लोकराजा म्हणजे हसन मुश्रीफ होय. ते गोरगरिबांचे सुपरस्टार आहेत, असेही माने म्हणाले.
स्वागत नगराध्यक्षा माणिक रमेश माळी यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी व विशाल बेलवळेकर यांनी केले.