खा.अमोल कोल्हेंकडून व्हिडीयो पोस्ट
कोल्हापूर : प्रतिनिधी
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत. त्यानंतर राजा शिवछत्रपती मध्ये सुद्धा शिवरायांची भूमिका त्यांनी साकारली आहे. या दोन्ही मालिकांनंतर लोकांच्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळंच स्थान निर्माण झालं आहे. याचीच प्रचिती स्वतः कोल्हे यांना कोल्हापूरात आली.
खा. अमोल कोल्हे हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीच्या पार्श्वभुमीवर काल त्यांची प्रचारसभाही झाली. कोल्हापूरात छत्रपती ताराराणी चौकामध्ये आपल्या वाहनातून जात असताना बाजूने जात असलेल्या गाडीवरील एका चिमुकल्याने त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. हा क्षण कॅमेरात कैद झाला असून त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवाय लहानग्यांचं हे निर्व्याज प्रेम वेगळीच उर्जा देतं आणि जबाबदारीची जाणीव करून देते असे कॅप्शन सुद्धा दिले आहे. लहान मुलाचा नमस्कार केलेला हा व्हिडीयो सध्या खुप व्हायरल होत आहे.