प्रतिनिधी / कोल्हापूर
चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यशवंत बापू नलवडे (वय 51 रा. ता. शाहूवाडी) असे आरोपीचे नांव आहे. 28 ऑक्टोंबर 2020 रोजी ही घटना शाहूवाडी तालुक्यात घडली होती. सरकारी वकील म्हणून अॅड. मंजूषा पाटील यांनी काम पाहिले. पिडीतेच्या आईने या घटनेची तक्रार शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिली होती.
यशवंत बापू नलवडे हा शाहूवाडी तालुक्यातील एका गावामध्ये कुटूंबासह राहतो. त्याला दोन 5 व 3 वर्षाची दोन नातवंडे आहेत. या नातवंडासेंबत खेळण्यासाठी परिसरातील एक 3 वर्षाची चिमुरडी नेहमी येत होती. 28 ऑक्टोंबर रोजी यशवंत नलवडे घरामध्ये एकटाच होता. यावेळी पिडीत चिमुरडी नलवडेच्या घरी आला. यावेळी नलवडे याने घरामध्ये एकटाच असल्याचा फायदा घेत पिडीत चिमुरडीवर अत्याचार केला. यामुळे घाबरलेल्या चिमुरडीने घडलेली घटना तिच्या आईला सांगितली. याचा जाब विचारण्यासाठी पिडीतेची आई नलवडे याच्या घरी गेली होती. यावेळी नलवडे घरामध्येच दार लावून बसला होता. परिसरातील नागरीकांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी नलवडेला घराबाहेर बोलविण्याचा प्रयत्न केला मात्र तो आला नाही. यानंतर नलवडे याची सून घराच्या मागील दरवाजातून घरात आली. यानंतर नलवडे घरातून बाहेर पडला व पिडीतेच्या आईला धमकावू लागला. जमलेल्या नागरीकांनी त्याला ताब्यात घेवून शाहूवाडी पोलीसांच्या ताब्यात दिले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजीनी चव्हाण यांनी या घटनेचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यानंतर 23 नोव्हेंबर 2021 पासून या घटनेची सुनावणी सुरु झाली. सरकारी पक्षातर्फे 19 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पिडीत मुलगी, साक्षी दुधगांवकर, संतोष पाटील, संगिता पाटील, साक्षी पाटील यांच्यासह वैद्यकीय तपासणी करणारे डॉ. दत्तात्रय तराळ, डॉ. वामन शिवेश्वरकर, डॉ. हेमलता पांडे, पंच साक्षीदार अर्जुन पाटील, समुदेशक वैशाली बुटाले, विशाल गोडबोले, विराज पाटील यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. तसेच सरकारी वकील अॅड. मंजुषा पाटील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी यशवंत नलवडे यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजीनी चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल फारुख पिरजादे यांची मोलाची मदत लाभली.