कोरोना काळात कोट येथे महेश करंबेळेंची निर्मिती
प्रतिनिधी/ लांजा
आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध चित्रकार कोकणचे सुपुत्र महेश करंबेळे यांनी 25 फुट लांब व 6 फुट उंचीची कोरोना काळातील सर्वात मोठी ऍबस्ट्रक्ट चित्रकृती लांजा तालुक्यात कोट गावातील चिरेखाणीत नुकतीच साकारली. सोशल मिडियावर ही प्रतिकृती सध्या जगभर चांगलीच चर्चेत आली असून कलाप्रेमींचा याला मोठा प्रतिसाद लाभत आहे.
महेश करंबेळे लांजा तालुक्यात झाशीची राणी लक्ष्मीबाईचे सासर असलेल्या कोटचे सुपुत्र आहेत. गेली 15 वर्षे चित्रकार म्हणून ते नवनवे प्रयोग करत आहेत. मुंबईमधील दैनंदिन सामाजिक जीवन या विषयावरील त्यांच्या तैलचित्रांनी त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवुन दिली आहे. न्यूयॉर्क आर्ट फेस्टिवल, मिलान फेस्टीवल, अँमस्टरडॅम फेस्टिवल, दुबई आर्ट फेस्टिवल, रशिया आर्ट फेस्टिवल आदी आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टिवलमध्ये सातत्याने भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया करंबेळे यांचा मुंबईतील चाळीमधून झालेला प्रवास थक्क करणारा आहे.
कोरोना महामारिचा कला क्षेत्रावरही विपरित परिणाम झाला आहे. विविध जागतिक आर्ट फेस्टिवल्स पुढे ढकलण्यात आले. बऱयाच वर्षांनी गावी आलेल्या महेश करंबळे यांनी कोरोनाकाळात मिळालेल्या वेळेचा सदूपयोग करीत आपल्या कोट या मुळ गावातील चिरेखाणीत कोरोना काळातील ऍबस्ट्रक्ट (अमूर्त ) चित्र प्रकारातील मोठी चित्रकृती साकारली आहे. कलेविषयीच्या जाणिवा नव्या पिढीत रुजाव्यात यासाठी गावातील स्थानिक मुलांनाही त्यांनी यामध्ये सहभागी करुन घेत चित्रकलेतील बारकावे टिपण्याची संधी दिली. आयुष्यात जोपासलेली एखादी कला सर्वोत्तम यश मिळवून देते हा संदेश देणारी महेश करंबेळे यांची चित्रकला आणि मार्गदर्शन नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. कोकणचा झेंडा सातासमुद्रापार फडकावणाऱया चित्रकार महेश करंबेळे यांच्या या उपक्रमाला सोशल मिडियाने उचलून धरले असून जगभरातून याला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.