39 हजार टन कपडय़ांचा कचरा, ढिगात लोक शोधतात उपयुक्त कपडे
दक्षिण अमेरिकन देश चिली स्वतःच्या सुंदर पर्वतांसाठी जगभरात ओळखला जातो. या देशात 20 हजार फुटांहून अधिक उंचीचे पर्वत आहेत, पण चिलीच्या एटाकामा वाळवंटात एक असा पर्वत आहे, जो कपडे आणि पादत्राणांनी निर्माण झाला आहे. या पर्वतावर ख्रिसमस स्वेटरपासून स्की बूटापर्यंतचा कचरा सामील आहे.
येथे फेकण्यात आलेल्या कपडय़ांचा डोंगर दरवर्षी सुमारे 39 हजार टनाने वाढत चालला आहे. वेगाने वाढणाऱया फॅशन उद्योगामुळे प्रदूषणही वाढत चालले आहे. कपडय़ांचा ढिग खुल्या जागेत केल्याने आणि जमिनीत पुरल्याने ते पर्यावरणाला नुकसान पोहोचवितात. यातील रसायने हवा आणि भूमिगत जलामध्ये पोहोचून त्यांना प्रदूषित करतात.
चिली दीर्घकाळापासून जुन्या आणि विक्री न झालेल्या कपडय़ांचे मुख्य केंद्र राहिले आहे. हे कपडे चीन किंवा बांगलादेशात तयार झालेले असतात. उत्तर चिलीच्या ऑल्टो होस्पिसियो भागात इक्विक बंदरावर दरवर्षी सुमारे 59 हजार टन वजनाचे कपडे येतात. तेथे त्यांची खरेदी कपडय़ांचे व्यापारी करतात. तेथून सीमा ओलांडून अन्य दक्षिण अमेरिकन देशांमध्ये कपडय़ांची तस्करीही केली जाते.
काही लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वापरण्यात आलेल्या कपडे शोधण्यासाठी पोहोचतात. पण अनेक लोक कपडय़ांची विक्री करण्यासाठी ते गोळा करतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2019 च्या एका अहवालानुसार 2000-2014 दरम्यान जगभरात कपडय़ांचे उत्पादन दुप्पट झाले आहे. जागतिक स्तरावर पाण्याच्या नासाडीसाठी कापड उद्योग 20 टक्के जबाबदार आहे.
सिंथेटिक केमिकलने प्रक्रियाकृत करण्यात आलेल्या कपडय़ांचे विघटन होण्यासाठी 200 वर्षे लागू शकतात. ते टायर किंवा प्लास्टिकसारखेच विषारी असतात. इकोफाइब्रा आणि इकोसायटेक्स या कंपन्या या कपडय़ांचे रिसायकल करण्याचे काम करतात. सेंटियागोमध्ये इकोसायटेक्सच्या स्टोअरमध्ये वापरण्यात आलेले कपडे विकले जातात. ही कंपनी या कपडय़ांयच तुकडय़ांद्वारे धाग्यांची निर्मिती करते.