मशिदींवर ध्वनिक्षेपकाला बंदी : अरबी भाषेस मज्जाव
वृत्तसंस्था / सान्या
उइगूर मुस्लिमांवर अत्याचार करणारा चीन आता उत्सुल मुस्लिमांची ओळख नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. दक्षिण चीन समुद्राला लागून असलेल्या चीनच्या सान्या शहरात राहणाऱया 10 हजार उत्सुल मुस्लिमांचे शोषण करताना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उत्सुल मुस्लिमांना मशिदींवर ध्वनिक्षेपक लावण्यास मज्जाव केला जात आहे, नव्या मशिदींच निर्मिती रोखण्यात आली असून अरबी शिकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
उत्सुल मुस्लिमांची धार्मिक ओळख संपुष्टात आणण्याचा आणि त्यांना ‘लाल रंगा’त रंगविण्याचा चिनी कम्युनिस्ट पक्षाचा प्रयत्न आहे. हैनान बेटावर वसलेल्या या शहरात कम्युनिस्ट पक्षाने विदेशी प्रभाव आणि धर्मांच्या विरोधात मोहीमच उघडली आहे. यापूर्वी चिनी प्रशासन उत्सुल मुस्लिमांना त्यांची ओळख कायम ठेवण्यासाठी समर्थन देत होते, पण क्षी जिनपिंग सत्तेवर आल्यापासून उत्सुल मुस्लिमांची ओळख समाप्त करण्याची मोहीम सुरू झाल्याचे स्थानिक धार्मिक नेत्यांनी सांगितले आहे.
चीनचे इस्लामविरोधी पाऊल
पूर्ण चीनमध्ये एकच संस्कृती असावी आणि त्याचेच सर्वांनी पालन करावे असा कम्युनिस्ट पक्षाचा प्रयत्न आहे. चीनमध्ये इस्लाम आणि मुस्लीम समुदायावर लादण्यात आलेल्या बंधनांचा उद्देश हिंसात्मक धार्मिक उग्रवादावर नियंत्रण मिळविणे असल्याचा दावा कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. चिनी प्रशासनाने उइगूर मुस्लिमांच्या विरोधातील स्वतःच्या मोहिमेला याच आधारावर न्यायसंगत ठरविले आहे.
उत्सुल मुस्लीम संकटात
शहरात 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या अरबी शिकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अरबी भाषा शिकल्याने इस्लामविषयी माहितीत भर पडत होती. अरब देशांमधून येणाऱया पर्यटकांशी संवाद साधणे सोपे ठरायचे असे उत्सुल मुस्लिमांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूवीं शाळांमध्ये मुलींना हिजाब परिधान करण्यापासून रोखण्यात आले होते. पण मोठा विरोध झाल्यावर हा निर्णय बदलण्यात आला होता.