नेत्यांना दिली इमानदारीची शपथ
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनचे गुप्तचर विभाग प्रमुख डोंग जिंगवेई हे कथितरित्या अमेरिकेत फरार झाल्याचा कयास असताना अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ईमानदारीची शपथ घ्यायला लावली आहे. तसेच त्यांना ‘मुख्य नेतृत्व’ मानणे तसेच चीनचे आधुनिकीकरण आणि राष्ट्रीय कायापालटासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
जिनपिंग यांनी पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या 25 सदस्यांना ही शपथ घ्यायला लावली आहे. याचे सरकारी टेलिव्हिजन प्रसारण करण्यात आले आहे. यावेळी जिनपिंग यांच्यासोबत क्रमांक दोनचे नेते पंतप्रधान ली क्विंग देखील उपस्थित होते. राजकीय अखंडत्व कायम ठेवण्याच्या गरजेविषयी स्वतःची जागरुकता वाढवा तसेच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत ताळमेळ राखा असे जिनपिंग यांनी या नेत्यांना सांगितले आहे.
गुप्तचर विभाग प्रमुख डोंग अमेरिकेत पोहोचले असल्यास जिनपिंग यांची अनेक गुपिते जगासमोर येण्याची शक्यता आहे. चीनचे अनेक छुपे कार्यक्रम देखील उघड होणार असल्याने जिनपिंग यांना मोठय़ा संकटाची चाहुल लागत असावी असे बोलले जात आहे.