अमेरिकेचे अत्यंत कठोर पाऊल
वॉशिंग्टन :
अमेरिकेने अत्यंत कठोर पाऊल उचलत चीनला ह्युस्टन येथील महावाणिज्य दूतावास 72 तासांच्या आत बंद करण्याचा आदेश दिला आहे. अमेरिकेच्या या आदेशानंतर चिनी दूतावासाचे कर्मचारी गोपनीय दस्तऐवज जाळताना दिसून आले आहेत. तर अमेरिकेच्या या आदेशानंतर चीन संतप्त झाला असून त्याने प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
चीनसोबतचा गंभीर तणाव पाहता ह्युस्टन येथील महावाणिज्य दूतावास बंद करण्याचा आदेश अमेरिकेने दिला आहे. महावाणिज्य दूतावास बंद करण्याच्या आदेशामुळे चीनच्या विदेश मंत्रालयात खळबळ उडाली आहे.
अमेरिकेने हा चुकीचा आदेश मागे न घेतल्यास ‘न्यायसंगत आणि आवश्यकतेनुसार’ प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार असल्याचे चीनने म्हटले आहे.
आगीची माहिती कळताच ह्युस्टनच्या अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली असली तरीही त्यांना दूतावासात प्रवेश देण्यात आलेला नाही. चीनच्या दूतावासात दिसून येणाऱया आगीच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत.