जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला असता कोरोनाचा उगम जेथून झाला तो चीन या विषाणूच्या संहारक स्वरूपास आळा घालण्यात बऱयापैकी यशस्वी झाल्याचे चित्र आहे. चीनचा कोणताही दावा किती विश्वासार्ह मानला जावा हा मुद्दा असला तरी मार्चमधील चीन व मेमधील चीन यातील फरक, विशेषतः अमेरिका कोरोनाच्या तडाख्यातून सुटण्याची निकराची लढाई लढत असताना जाणवण्याइतपत आहे. दोनच दिवसांपूर्वी एका विश्वविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थीवर्गास संबोधित करताना चीनचे सर्वोच्च नेते शी जिनपिंग यांनी ‘कोरोनाची ही आपत्ती चीनसाठी नव्या संधी घेऊन येणारी ठरणार आहे. कोणताही मोठा ऐतिहासिक विकास हा नेहमी मोठय़ा आपत्तीनंतरच होतो. आमचा देश हा आतापर्यंत अशा संकटांना व आपत्तीना तोंड देऊनच मोठा झाला आहे.’ असे दिलासादायक उद्गार काढले आहेत. केवळ महिन्यापूर्वीच हादरलेल्या, भयचकित चिनी जनतेसमोर जाणारे जिनपिंग आणि परवाचे जिनपिंग यांच्या आत्मविश्वासातील बदल जाणवण्यासारखा होता. चीनमध्येच हा विषाणू तयार झाला, चीनने मोठय़ा संख्येने झालेले कोरोनाग्रस्तांचे मृत्यू दडवले आहेत, चीनचे जागतिक आरोग्य संघटनेवर वर्चस्व आहे, चीन ही आर्थिक महासत्ता यापुढे शिल्लक राहणार नाही असे अनेक आरोप दरम्यानच्या काळात चीनवर होत गेले. चिनी जनतेतही यामुळे आपल्या नेतृत्वाबद्दल संभ्रम निर्माण झाला. मात्र त्यानंतर अल्पकाळातच चीनने कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवले. युरोप आणि अमेरिकेतील कोरोना मृत्यूदर दिवसागणिक वाढत असताना चीनमधील परिस्थिती झपाटय़ाने निवळत गेली. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेस निधी देण्याचे अमेरिकेने नाकारल्यानंतर चीनने दोन अब्ज डॉलर्सचा निधी संघटनेस देऊन आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर चिनी नेतृत्वास नवे बळ प्राप्त झाले आहे.
चाळीस वर्षांच्या कालावधीतील चीनमधील स्थित्यंतरानंतर आणि त्यातून चिनी जनतेची भरभराट होऊन ही जनता चिनी कम्युनिस्ट पक्षाचा मूलाधार बनल्यानंतर चिनी ड्रगनचा गतिरोध कोरोना विषाणूने केला. इतक्मया वर्षानंतर चिनी सत्ता व अर्थव्यवस्थेपुढील हे पहिलेच मोठे संकट ठरले. ते ध्यानात घेऊन पॉलिट ब्युरोला संबोधित करताना जिनपिंग यांनी ‘आंतरराष्ट्रीय साथीचा आणि अर्थव्यवस्थेचा आढावा घेताना आम्ही या नाजूक व गुंतागुंतीच्या प्रसंगातून पुढील जग कसे आकार घेते याकडे बारीक लक्ष द्यावयास हवे. बाहय़ परिस्थितीत होणारे दूरगामी बदल आत्मसात करून त्यांना वस्तुनि÷ मानसिकतेने सामोरे जाण्याची तयारी ठेवावयास हवी, असे वक्तव्य केले. याचबरोबरीने गेल्या काही आठवडय़ात जिनपिंग यांनी चीनमधील कारखाने, कार्यालये, इस्पितळे, कृषी केंदे यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. परिस्थितीत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत या साऱया उपक्रमातून, सुरुवातीस झालेल्या चुका, साथीवरील नियंत्रण सुटणे यामुळे निर्माण झालेले चीनविरोधी जागतिक वातावरण आणि त्यातून डळमळीत झालेली चिनी जनतेची मानसिकता यावर उपचार करून आपले नेतृत्व पुनर्पस्थापित करण्याची आणि पक्षाची विश्वासार्हता अबाधित ठेवण्याचे जिनपिंग यांचे प्रयत्न आहेत हे उघडच आहे.
या साऱया पार्श्वभूमीवर कोरोना साथीमुळे चीन व त्याचबरोबरीने अमेरिकेचे अर्थव्यवस्थेतील स्थान पूर्वीप्रमाणे राहणार नाही असे निरीक्षण जगभरातून पुढे आले. ते तथ्यहीन नसले तरी या निरीक्षणाबाबत चीन सजग आहे आणि आपले स्थान अबाधित ठेवण्यासाठीची संधी या देशास कोरोना उत्पातातून लवकर सावरल्यामुळे मिळण्याची दाट शक्मयता आहे. आतापर्यंत चीनने आर्थिक जागतिकीकरण आणि तंत्रवैज्ञानिक क्रांतीच्या अनुषंगाने, धोरणे, संसाधने, व्यापार, वित्तव्यवस्था व संपर्क यासाठी क्षेत्र व रस्ते निर्माण करण्यात मोठाच पुढाकार घेतला होता. या गरजांच्या निर्मितीतील योगदानामुळे आर्थिक महासत्ता हे चीनचे स्थान प्रस्थापित होण्यात बरीच मदत झाली. तेव्हापासून केवळ आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक प्रगती इतपत आपले उद्दिष्ट मर्यादित न ठेवता चीनने सायबर, अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी नव्या क्षेत्रात नवे आंतरराष्ट्रीय पायंडे पाडून जागतिक आर्थिक नेतृत्व आपल्याकडे खेचण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केला. याच बरोबरीने पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक नियमांचे जणू पुनर्लेखन करताना, उत्पादन, विनिमय आणि उपयोग यासाठीचे नवे मापदंड निर्माण केले. चीन यानंतर औद्योगिक आंतरजाल पद्धती, पुढील पिढीसाठी ती माहिती व तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रासाठी विशेष निर्मिती करून या उदयोन्मुख क्षेत्रावर वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. इतर मातब्बर देश कोरोना साथीमुळे हैराण झालेले असताना संवेदनशील उपकरणांचे उत्पादन, वाहकविहिन वाहने, सायबर सुरक्षा या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करून नवनिर्मितीची प्रेरणा बाळगून आहे. यासाठीची पूर्वतयारी व पायाभरणी झाली असल्यामुळे एका बाजूस कोरोनापासून आपला बचाव करत दुसऱया बाजूने जागतिक अर्थव्यवस्थेवरील आपली पकड भक्कम करण्याची संधी या संकटकाळात आपल्याकडे आहे असा विश्वास चीनला वाटतो आहे. अर्थात हे सारे चीन शक्मय करू शकणार आहे का याचे उत्तर भविष्यकाळच देईल. परंतु आज अमेरिका, ब्रिटन, रशिया, ब्राझील ही राष्ट्रे पूर्णतः कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. पाश्चिमात्य अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या वस्तुस्थितीकडे पाहता, ज्या देशाकडे भविष्यकालीन आर्थिक धोरण व ते राबविण्याची क्षमता आहे, जो देश कोरोना साथीवर नियंत्रण ठेवून आपले आर्थिक क्षेत्र कार्यक्षम व गतिमान करण्यात जलदगतीने यशस्वी झाला आहे, तो भविष्यकाळात स्वतःची अर्थव्यवस्था अधिक बळकट करून जागतिक अर्थव्यवस्थेवरही प्रभाव टाकेल हे निश्चित आहे.
अनिल आजगावकर
मोबा.9480275418