कोरोना संसर्गाची भीती विसरून शेकडो लोकांचा सहभाग : जगभरात आता 2,23,33,691 कोरोनाबाधित
जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 2 कोटी 23 लाख 33 हजार 691 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 50 लाख 70 हजार 33 बाधितांनी महामारीवर मात केली आहे. चीनच्या वुहान समवेत अनेक शहरांमध्ये पूल पार्टी करण्याची सूट देण्यात आली आहे. काही सोप्या अटींची पूर्तता करून अशा पाटर्य़ांमध्ये शेकडो लोक एकाचवेळी सामील होत आहेत. चीनमध्ये जून महिन्यात एम्युजमेंट पार्क खुले करण्याची अनुमती देण्यात आली होती. तेव्हापासूनच वुहान, शांघाय आणि चोंगकिंग समवेत अनेक शहरांच्या वॉटर पार्कमध्ये पूल पार्टी आयोजित होत आहे. यात सामील होण्यासाठी लोकांना नॅशनल आयडी क्रमांक देऊन ऑनलाईन तिकीट घ्यावे लागते. हेल्थ टॅकिंगसाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय ऍपद्वारे कोड डाउनलोड करून दाखविल्यावर तेथे प्रवेश मिळतो.
5 चुकांमुळेच उद्भवली कोरोनाची दुसरी लाट : जपानमधील तज्ञांचा दावा
जपानमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला आहे. आठवडय़ाभरापासून सरासरी 1,000 नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. जपानमध्ये महामारीच्या प्रारंभी ‘3-सी’वर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यात क्लोज्ड स्पेस, क्राउडेड स्पेस आणि क्लोज कॉन्टॅक्टवर लक्ष देण्यात आले होते. प्रारंभित काळात 3-सीद्वारे मदत मिळाल्याचे दिसून आले, परंतु मार्चमध्ये रुग्ण वाढू लागल्यावर एप्रिलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली. ही आणीबाणी मे महिन्यात हटविण्यात आली. जुलैमध्ये सरकारने कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविल्याचा दावा केला होता. परंतु दुसऱया लाटेत सरकार अपयशी होताना दिसून येत आहेत. नेमकं कुठं चुकलं यासंबंधी तेथील तज्ञांनी विश्लेषण केले आहे.
चाचण्यांचे प्रमाण वाढले नाही
संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान लॅब टेस्टिंग वाढविण्यात आले नाही. डॉक्टरांच्या आवाहनानंतरही आरोग्य केंद्रांनी पीसीआर चाचण्या केल्या नाहीत. चाचण्यांच्या मदतीने समूह संसर्ग रोखणे शक्य झाले असते. चाचण्यांच्या अभावी निदान न झालेले रुग्ण वेगाने वाढले आणि याचबरोबर नोंदणी संगणकीय पद्धतीने न करण्यात आल्याने चुकाही झाल्या.
जागरुकतेत अपयश
अधिकारी कठोर नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करू न शकल्याने महामारीला सामान्य मानून लोकांनी दिनक्रम सुरूच ठेवला. आणीबाणीच्या कालावधीत लोकांपर्यंत योग्य पद्धतीने स्थितीची कल्पना पोहोचविता आली नाही. लोकांना घरातच राहण्याची अनिवार्यता समजावून सांगणे वारंवार हात धुणे, योग्य आहार यासारख्या बाबी सांगण्यात आल्या नाहीत.
उत्तरदायित्वाचा अभाव
टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला. या निर्णयाकरता कुठली प्रक्रिया अवलंबिण्यात आली, निर्णयास विलंब का लागला यासंबंधी कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. या कारणामुळे लोकांचा विश्वास घटला आहे.
ताळमेळ नसणे
सरकार आणि महामारी विषयक तज्ञांच्या समितीदरम्यान ताळमेळीचा अभाव राहिला आहे. समितीने संसर्गाच्या प्रारंभीच सामाजिक संपर्क 80 टक्क्यांनी कमी करण्याची शिफारस केली होती. हे प्रमाण अधिक वाढविणे गरजेचे होते. परंतु सरकारने हे प्रमाण कमी करत आधी 70 टक्के आणि पुढील काळात 60 टक्क्यांवर आणले. याच कारणामुळे लोकांनीही गांभीर्य राखले नाही.
समिती विसर्जित
सरकारने जून महिन्यात तज्ञांची समिती विसर्जित केली आहे. याचदरम्यान रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जुलै महिन्यात स्थिती अधिकच बिघडविली आहे. तर देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशात सध्या 55,667 रुग्ण असून 1,099 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत आता विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग
अमेरिकेच्या 6 विद्यापीठांमध्ये 200 पेक्षा अधिक विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 5 प्रांतांच्या शाळांमधील 2 हजारपेक्षा अधिक मुलांना विलगीकृत करण्यात आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ आयोवामध्ये सर्वाधिक 175 विद्यार्थ्यांना लागण झाली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ नोट्रेडेम येथील 80 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा चाचणी अहवाल होकारात्मक आला आहे. जॉर्जियाच्या चेरोकी काउंटी स्कुलच्या सर्वाधिक 1,100 विद्यार्थ्यांना विलगीकृत करण्यात आले आहे. अमेरिकेत 3 ऑगस्ट रोजी शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याची अनुमती देण्यात आली होती.
भारताला अमेरिकेची मदत
अमेरिका सरकारच्या एजेंसी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने (युएसएआयडी) भारताला 100 नवे व्हेंटिलेटर दिले आहे. महामारीच्या विरोधात भारत आणि इंडियन रेड सोसायटीसोबत मिळून लढण्यासाठी अमेरिकेकडून चालविल्या जाणाऱया कार्यक्रमांतर्गत हे व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. अमेरिकेतील भारतीय दूतावासाने बुधवारी यासंबंधी माहिती दिली आहे.
द. आफ्रिका : लसीची चाचणी
दक्षिण आफ्रिकेत अमेरिकेकडून विकसित करण्यात येणाऱया लसीची मानवी चाचणी लवकरच सुरू होणार आहे. अमेरिकन कंपनी बायोटेकच्या या लसीचे नाव नोवावॅक्स आहे. याचे डोस 2,900 पेक्षा अधिक स्वयंसेवकांना दिले जाणार आहेत. कंपनीने ही लस सार्स कोव-2 च्या जेनेटिक सिक्वेंसच्या मदतीने तयार केली आहे. दक्षिण आफ्रिकेत 5 लाखांहून अधिक रुग्ण आहेत.
चिनी मजूर बाधित
इस्रायलमध्ये बांधकामाशी संबंधित 110 मजूर बाधित सापडले असून हे सर्वजण चीनचे नागरिक आहेत. देशातील टेकवा शहराच्या पेटाच भागात हे चिनी मजूर वास्तव्य करत होते. स्थानिक प्रशासनाला सर्वप्रथम 13 ऑगस्ट रोजी तेथे राहणारे 20 मजूर बाधित झाल्याची माहिती दिली होती. चाचणी केली असता यातील 110 जणांचा अहवाल होकारात्मक आला आहे.
ब्राझील : 47 हजार रुग्ण
ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 47 हजार 784 नवे रुग्ण सापडले असून 1,352 जणांना जीव गमवावा लागला आहे. तेथील आरोग्य मंत्रालयानुसार आता बाधितांची संख्या 34 लाख 11 हजार 872 झाली आहे. तर बळींचे प्रमाण 1 लाख 10 हजार 19 वर पोहोचले आहे. रुग्णसंख्या वाढूनही देशात उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची मंजुरी देण्यात आली आहे.
इराक : 4,576 नवे रुग्ण
इराकमध्ये दिवसभरात नवे 4,576 कोरोनाबाधित सापडले आहेत. तर एकूण संख्या 1,84,709 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 6,036 जणांचा मृत्यू ओढवला आहे. तर 500 पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. इराकमध्ये चाचण्यांचे प्रमाण तुलनेत कमी असल्याने संसर्गाचा किती फैलाव झाला याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होत नाही.
आयर्लंड : निर्बंध वाढले
आयर्लंडने मंगळवारपासून निर्बंध वाढविले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे. पुढील दोन आठवडय़ांपर्यंत सार्वजनिक ठिकाणी गर्दीयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करू नये असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. परंतु छोटय़ा व्यापाऱयांना दुकाने सुरू ठेवण्याची सूट देण्यात आली आहे.