क्वालांलपूर
मलेशियाने दक्षिण चीन समुद्रात चीनला आव्हान दिले आहे. मलेशियाच्या मेरीटाइम इन्फोर्समेंट एजेन्सीने चीनच्या 6 मासेमारी करणाऱया नौका जप्त केल्या आहेत. या नौका मलेशियाच्या सागरी सीमेतील जोहोरच्या उपसागरात अवैधपणे शिरल्या होत्या. या नौकांवरील 60 चिनी नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. मलेशियाच्या सागरी क्षेत्रात मोहीम सुरू असताना दोन वेगवेगळय़ा ठिकाणी चिनी नौका दिसून आल्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती एजेन्सीच्या तानजुंग सिडिलि क्षेत्राचे संचालक कॅप्टन मोहम्मद जुल्फादली नयन यांनी दिली आहे.
जोहोर बंदर प्राधिकरणाकडून आम्हाला काही नौका मलेशियाच्या सीमेत घुसल्याची माहिती मिळाली होती. आमच्या गस्त पथकाने 2 ते 3 सागरी मैलाच्या अंतरावर चिनी नौकांना पाहिले. यातील 3 नौका परस्परांभोवतीच फिरत होत्या. नौकांवर 6 कॅप्टन आणि चालक दलाचे 54 सदस्य कार्यरत होते. हे सर्वजण चीनचे नागरिक असून त्यांचे वय 31 ते 60 वर्षांदरम्यान आहे. त्यांच्या विरोधात मर्चंट शिपिंग ऑर्डिनेन्स अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती मलेशियाच्या अधिकाऱयाने दिली आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर सुमारे 17 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा तुरुंगवास होऊ शकतो.
मलेशियाचाही दावा
मलेशिया देखील दक्षिण चीन समुद्राच्या काही क्षेत्रांवर स्वतःचा दावा सांगतो. या सागराचे काही क्षेत्र आपल्या इकॉनॉमिक एक्सक्लूजन झोनमध्ये येत असल्याचा त्याचा युक्तिवाद आहे. या इकॉनॉमिक एक्सक्लूजन झोन्सची निश्चिती 1982 मध्ये ‘युनायटेड नेशन्स कन्व्हेंशन ऑन द लॉ ऑफ द सी’मध्ये करण्यात आली आहे. चीनची जहाजे अनेकदा मलेशियाला लागून असलेल्या सागरी क्षेत्रात शिरली आहेत. या क्षेत्रात मलेशियासोबतच व्हिएतनाम, फिलिपाईन्स, तैवान, इंडोनेशियासमोर चीन अडचणी निर्माण करत आहे.