ऑनलाईन टीम / तेल अवीव :
चिनी राजदूत डू वेई यांचा इस्रायलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. इस्रायलमधील नवीन सरकारच्या शपथविधीपूर्वी काही तास आधी डू वेई यांचा मृतदेह हर्टजलिया येथील त्यांच्या घरी आढळला आहे. इस्रायलमधील माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी महिन्यात डू वेई यांनी इस्रायलमधील चीनचे राजदूत म्हणून पदभार स्विकारला होता. इस्रायलमधील नवीन सरकारच्या शपथविधीला काही तासांचा अवधी असताना त्यांचा राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. मृतदेहावर कोणतीही जखम नाही, त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने डू वेई यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डू वेई यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.