40 लाख लोकांना घरात कैद राहण्याचा आदेश
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या अनेक हिस्स्यांमध्ये कोरोना संक्रमण वाढत चालले आहे. याचमुळे चीनच्या सरकारने लान्झोउ शहरात लॉकडाउन लागू केले आहे. आपत्कालीन स्थितीतच लोकांना घराबाहेर पडण्याची अनुमती मिळणार असल्याचे प्रशासनाच्या आदेशात म्हटले गेले आहे.
चीनमध्ये देशांतर्गत संक्रमणाचे 29 नवे रुग्ण सापडले आहेत. यातील 6 रुग्ण लान्झोउ येथील आहेत. लान्झोउ शहर हे गांसू प्रांताची राजधानी असून येथील लोकसंख्या 40 लाख इतकी आहे.
लान्झोउमध्ये लोकांच्या ये-जा करण्यावर कठोर देखरेख ठेवण्यात येणार आहे. लोकांना आवश्यक सामग्रीची खरेदी किंवा वैद्यकीय उपचारासाठी घरातून बाहेर पडण्याची मुभा देण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांना परस्परांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनचे प्रशासन अत्यंत सतर्क आहे. उत्तर चीनमध्ये हजारो लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पर्यटनस्थळी लोकांच्या ये-जा करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यंत आवश्यक असेल तरच शहरातून बाहेर पडा असा सल्ला स्थानिक लोकांना देण्यात आला आहे.
एजिन शहरातही लॉकडाउन
चीनच्या इनर मंगोलिया प्रांतातील एजिन काउंटीत लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. तेथील लोकसंख्या 35,700 इतकी आहे. एजिन हे कोरोनाच्या हॉटस्पॉट्सपैकी एक आहे. चीनमध्ये एका आठवडय़ात 11 प्रांतांमध्ये कोरोनाचे संक्रमण फैलावले आहे.