20.58 मीटर्सची लक्षवेधी फेक, उष्णतेमुळे सर्वच ऍथलिट्सची दमछाक
चीनच्या गाँग लिजियावने महिलांच्या गोळाफेकीत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी साकारत सुवर्णपदक जिंकले. 40 डिग्री सेल्सियस तापमानामुळे टोकियोत बहुतांशी ऍथलिट्सची बरीच दमछाक होत असून गोळाफेकीतील स्पर्धकांना देखील याचा अनुभव आला. गाँगने येथे 20.58 मीटर्सची लक्षवेधी फेक केली.
डबल वर्ल्ड चॅम्पियन गाँगने यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे चौथे, तिसरे व दुसरे स्थान संपादन केले होते. यंदा तीच सरस कामगिरीची मालिका कायम राखत तिने अव्वल यश प्राप्त केले.
महिला गोळाफेकीत यंदा अनेक ऍथलिट डोपिंगमुळे बाहेर फेकले गेले आहेत. रविवारी तिने सर्वही पाच थ्रो उत्तम केले आणि आपल्या शेवटच्या प्रयत्नात कारकिर्दीतील सर्वोत्तम फेक करण्यात ती यशस्वी ठरली. अमेरिकेच्या रेव्हन सॉन्डर्सने रौप्य तर न्यूझीलंडच्या व्हॅलेरी ऍडम्सने कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली.