हिंदी महासागरात चीनच्या जहाजांचा अवैध वावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिंदी महासागरामध्ये चीनच्या संशोधक आणि मासेमारी जहाजांचा अवैध वावर मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत अनिर्बंध मासेमारी आणि संशोधनाच्या नावाखाली संवेदनशील माहिती जमा करण्याच्या प्रकारामुळे भारत सतर्क झाला असून चिनी नौकांच्या हालचालींवर भारतीय नौदल बारीक नजर ठेऊन आहे.
चिनी मासेमारी जहाजांचा विचार करता मागील 4 वर्षात हिंदी महासागरात तब्बल 450 जहाजांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. ही जहाजे कोणत्याही देशाच्या सागरी हद्दीच्या बाहेर आंतरराष्ट्रीय हद्दीत मासेमारी करतात. त्यामुळे या मासेमारीला कोणतेही निर्बंध राहत नाहीत. त्याचा परिणाम सागरी जैव परिसंस्थेवर होतो. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण आणि उत्तर कोरिया, जपान यांच्यापासून ते पश्चिम आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील माशांचे प्रमाण घटते. खोल समुद्रात केल्या जाणाऱया मासेमारीला चिनी सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे चिनी मासेमारांचा फायदा होत असला तरी इतर देशांचे आणि प्रामुख्याने सागरी पर्यावरणाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे.
या वर्षाच्या सुरूवातीला कराचीकडे जाणाऱया चिनी जहाजाने भारतीय सागरी हद्दीचा भंग केल्यापासून भारतीय संरक्षण दलाने चीनवरील नजर अधिक कडक केली आहे.