ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमधून भारतात पाठविण्यात आलेले रॅपिड टेस्टिंग किट उत्तमच असल्याचा दावा टेस्टिंग किट बनवणाऱ्या चीनी कंपन्यांनी केला आहे. याउलट भारतात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून या किटचा चुकीचा वापर झाल्याचे या कंपनीने म्हटले आहे.
चीनमधील Wondfo Biotech आणि Livzon Diagnostics या दोन कंपन्यांकडून 5 लाख कोरोना टेस्टिंग किट भारतात आयात करण्यात आले होते. या किटमधून चुकीचे निदान होत असल्याच्या तक्रारी राजस्थानमधून आल्याने या किटचा वापर थांबण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे. त्यानंतर चीनने या रॅपिड टेस्टिंग किटबाबत पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, या चिनी कंपन्यांनी टेस्टिंग किटमध्ये कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट करत भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांवरच किटचा चुकीचा वापर केल्याचे खापर फोडले आहे.
चीनमध्ये हजारो रुग्णालयांमध्ये या किटचा वापर केला जात असून, त्याचा रिझल्ट चांगला आहे. दोन्ही कंपन्यांनी किट वापरताना त्याच्यावर दिलेल्या सूचनांचे पालन केले तरच योग्य निकाल मिळेल, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.