अमेरिकेच्या निर्बंधांच्या भीतीने गुंतवणुकीस दिला नकार
युक्रेन युद्धानंतर निर्बंधांमुळे अडचणीत आलेल्या रशियाला चीनने संकटसमयी वाऱयावर सोडून दिले आहे. चीनच्या सरकारी तेल आणि गॅस कंपनीने पाश्चिमात्य निर्बंधांपासून वाचण्यासाठी रशियात 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. सध्या रशियात गुंतवणूक करण्याची योजना रोखत आहोत असे सिनोपेक ग्रूपने म्हटले आहे. या कंपनीला पूर्वी चाइना पेट्रोलियम अँड केमिकल ाŸर्पोरेशन या नावाने ओळखले जात होते. या चिनी कंपनीसोबत काम करत असलेल्या रशियाचा सर्वात मोठा पेट्रोकेमिकल उत्पादक सिबुरचा उच्चस्तरीय अधिकारी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचा निकटवर्तीय आहे. अशा स्थितीत चिनी कंपनीला पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांचा धोका होता.
रशियन कंपनी सिबुरच्या संचालक मंडळाचे सदस्य गेन्नेडी टिमचेंको यांना पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जाते. याचमुळे पाश्चिमात्य देशांनी गेन्नेडी यांच्यावरही निर्बंध लादले आहेत. गेन्नेडी हे रशियाचे सहाव्या क्रमांकाचे धनाढय़ आहेत. त्यानी वोल्गा ग्रुप इन्व्हेस्टमेंट फर्मची स्थापना केली आहे. आर्मेनियन वंशाचे उद्योजक टिमचेंको हे एसकेए सेंट पीटर्सबर्ग आइस हॉकी संघाचे अध्यक्ष देखील आहेत. पुतीन यांचे ज्युडो पार्टनर म्हणूनही त्यांची ओळख आहे.
20 वर्षांपासून मित्र
पुतीन आणि टिमचेंको यांची मैत्री 20 वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. 1990 च्या दशकात टिमचेंको यांनी सेंट पीटर्सबर्गमधून तेलाचा व्यापार सुरू केला होता. तेव्हा पुतीन हे रशियाचे उदयोन्मुख राजकारणी होते. त्यावेळी पुतीन आणि टिमचेंको यांनी मिळून गनवोर नावाची कंपनी स्थापन केली होती.
चीनने काढून घेतले अंग
गेन्नेडी टिमचेंको हे रशिया, फिनंलड आणि आर्मेनियाचे नागरिकत्व बाळगून आहेत. ते मॉस्कोत राहत असले तरीही त्यांचे कुटुंबीय स्वीत्झर्लंडमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलीचा विवाह रशियाचे माजी मंत्री सर्गेई प्रँक यांच्या मुलासोबत झाला आहे. टिमचेंको हे रशियन बँक रोसियाचे प्रमुख समभागधारक आहेत. रोसिया बँक रशियाच्या शासकीय प्रसारमाध्यमांच्या समुहाचा प्रमुख हिस्सेदार आहे. युक्रेनला अस्थिर करणाऱया रशियाच्या धोरणाचा पुस्कार या प्रसारमाध्यमांकडून केला जातो.