गौप्यस्फोटानंतर हाँगकाँगच्या तज्ञाने केले पलायन : फ्रान्समध्ये 30 हजारांहून अधिक बळी : जगभरात 1,26,53,451 बाधित
चीनवर कोरोना विषाणू फैलावल्याचा आरोप जगभरातून होत आहे. तर आपण कुठलीच माहिती लपविलेली नाही असा दावा चीनकडून केला जात आहे. परंतु आता हाँगकाँगच्या एका वैज्ञानिकाने चीनला कोरोना विषाणूसंबंधी फार पूर्वीपासून माहिती होती आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही यासंबंधी काहीच पाऊल उचलले नाही असा गंभीर आरोप केला आहे. हाँगकाँगच्य्या स्कुल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये वायरोलॉजी आणि इम्यूनॉलॉजीच्या तज्ञ डॉ. लि मेंग येन यांनी कोरोना विषाणूसंबंधीची माहिती चीनने जगापासून दीर्घकाळ लपवून ठेवल्याचा आरोप केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार प्राध्यापक मलिक पॅरिस यांनी या संसर्गासंबंधी काहीच पाऊल उचललेले नाही. पॅरिस हे डब्ल्यूएचओकडून मान्यताप्राप्त एका प्रयोगशाळेचे सहसंचालक देखील आहेत. कोरोना संकटासंबंधी गौप्यस्फोट केल्यावर लि मेंग यांनी जीव वाचविण्यासाठी चीनमधून पलायन केले आहे. चीनमधील आरोग्य यंत्रणेने महामारीच्या प्रारंभी त्याकडे दुर्लक्ष केले. या दुर्लक्षामुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागल्याचे मेंग म्हणाल्या.
डिसेंबरमध्ये सार्स विषाणूवर अध्ययन
चीन माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मेंग यांनी केला आहे. जीव वाचविण्यासाठी मेंग यांनी हाँगकाँगमधून पळ काढला आहे. कोरोना विषाणूसंबंधी सर्वप्रथम अध्ययन करणाऱया वैज्ञानिकांमध्ये लि मेंग यांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयोगशाळेत लि यांच्या निरीक्षकाने डिसेंबर महिन्यात चीनकडून मिळालेल्या सार्ससदृश विषाणूच्या क्लस्टरला अध्ययनाची जबाबदारी सोपविली होती.
डब्ल्यूएचओच्या भूमिकेत बदल
जागतिक आरोग्य संघटनेने स्वतःच्या संकेतस्थळावर विषाणूच्या घटनाक्रमात बदल केला आहे. कोविड-19 विषयी चिनी प्रशासन नव्हे तर आपल्याच वैज्ञानिकांकडून माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर सुमारे 6 महिन्यांपूर्वी डब्ल्यूएचओ प्रमुख डॉ. टेड्रोस यांनी चीननेच कोविड-19 विषयी कळल्याचा दावा केला होता. जो आता खोटा ठरला आहे.
माणसांमध्ये संसर्ग
डिसेंबर महिन्यातच माणसांमधून हा विषाणू फैलावण्याची शक्यता असल्याचे चीनच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनला कळविले होते. तर चीन तसेच जागतिक आरोग्य संघटनेने याच्या अनेक दिवसांनी याची पुष्टी दिली होती. चिनी प्रशासनानुसार विषाणूमुळे काही रुग्णांमध्ये गंभीर आजार होत असून हा सहजपणे लोकांमध्ये फैलावत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी महिन्यात म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेने माणसांमधील संसर्गावर तेव्हा मौन पत्करल्याचा आरोप मेंग यांनी केला आहे.
अमेरिकेत 60 हजारांहून अधिक नवे रुग्ण
जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 53 हजार 451 जणांना झाली आहे. यातील 73,87,661 बाधितांनी महामारीवर मात केली आहे. तर 5 लाख 63 हजार 517 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. अमेरिकेत संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला आहे. सलग तिसऱया दिवशी अमेरिकेत 60 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. तेथे सर्वाधिक 4 लाख 26 हजार 16 रुग्ण न्यूयॉर्कमध्ये आढळले आहेत. देशाच्या 28 प्रांतांमध्ये मागील आठवडय़ाच्या तुलनेत बाधितांचा आकडा वाढला आहे. वाढते रुग्ण पाहता अनेक प्रांतांनी निर्बंध पुन्हा कठोर केले आहेत. फ्रान्समध्ये मागील 24 तासांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर तेथील बळींचे प्रमाण 30,004 वर पोहोचले आहे. परंतु देशाच्या आरोग्य मंत्रालयानुसार रुग्णालय आणि आयसीयूत दाखल होणाऱया रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सद्यकाळात तेथे 7 हजार 62 बाधित रुग्णालयात दाखल आहेत. यातील 496 आयसीयूत उपचार घेत आहेत.
ब्रिटन : 75 देशांना अनुमती
ब्रिटनने शुक्रवारी 75 देशांमधून लोकांना येण्याची अनुमती दिली आहे. ब्रिटनच्या वाहतूक विभागाने या देशांची यादी जाहीर केली असून यात अमेरिकेचा समावेश नाही. प्रवास नियमांमध्ये दिलासा देण्यात आलेल्या देशांमधून येणाऱया लोकांना आता 14 दिवसांपर्यंत विलगीकरणात राहण्याची गरज भासणार नाही. ब्रिटनमध्ये मागील 24 तासांमध्ये 48 जण दगावले आहेत. याचबरोबर बळींचे प्रमाण 44,650 झाले आहे. देशाने मागील महिन्यात टाळेबंदी शिथिल केली होती.
पाकने इटलीला मागे टाकले
बाधितांप्रकरणी पाकिस्तानने इटलीला मागे टाकले आहे. 2 लाख 46 हजार 351 रुग्णांसह पाकिस्तान जगात 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दिवसभरात 2 हजार 751 नवे रुग्ण सापडले आहेत. पाकिस्तानात आतापर्यंत 5,123 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
फ्रान्स : योजनेत फसवणूक
फ्रान्समध्ये महामारीमुळे बेकार झालेल्या लोकांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेत फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. सरकारने रेस्टॉरंट, शाळा आणि उद्योगक्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांसाठी ही योजना सुरु केली आहे. यांतर्गत बेरोजगार कर्मचाऱयांना अनुदान दिले जाते. काही गुन्हेगारांनी योजनेचा गैरवापर केला आहे. योजनेंतर्गत दोन दशलक्ष युरो (सुमारे 17 कोटी) रुपये काढण्यात आले असून ते बेरोजगारांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आता याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पॅरिसच्या पॉसिक्युटर ऑफिसने दिली आहे.
बोलिवियात कोरोना संकट
बोलिवियामध्ये सिनेटच्या अध्यक्ष मोनिका एवा कोपा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना चाचणी होकारात्मक आली असून दिशानिर्देशांचे पालन करत असून काही काळापर्यंत आयसोलेशनमध्ये राहणार आहे. माझी प्रकृती स्थिर असून स्वतःचे काम करत राहणार असल्याचे मोनिका यांनी म्हटले आहे. बोलिवियाच्या अंतरिम राष्ट्रपती जीनिन एनेज शावेज, आरोग्यमंत्री, मध्यवर्ती बँकेचे प्रमुख आणि राष्ट्रपती राजवटीच्या प्रमुखांनाही कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
व्हेनेझुएलात टाळेबंदी
व्हेनेझुएलात शनिवारी टाळेबंदी एक महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. महामारी फैलावल्यानंतर चौथ्यांदा देशात टाळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. उपाध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी शुक्रवारी रात्री उशिरा याची घोषणा केली आहे. महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. व्हेनेझुएलात पहिल्यांदा 13 मार्च टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 8 हजार 803 बाधित सापडले असून 83 जणांचा बळी गेला आहे.