वृत्तसंस्था / शांघाय
कोरोना महामारी संकटाचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱया चीनने आपल्या देशातील कोरोना संदर्भातील नियम मोडल्याबद्दल 19 वर्षाखालील वयोगटाच्या सहा फुटबॉलपटूंवर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
संपूर्ण चीनमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली असताना सदर फुटबॉलपटू रात्री उशिरा परवानगीशिवाय मद्यसेवन करण्यासाठी बाहेर गेल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून नियमांचा भंग झाल्याने चीनच्या फुटबॉल संघटनेने दोषी फुटबॉलपटूंवर कारवाई केली आहे. सदर फुटबॉलपटूंना आता नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. याशिवाय ते प्रतिनिधित्व करणाऱया फुटबॉल क्लबनाही चीन फुटबॉल संघटनेतर्फे मोठा रकमेचा दंड करण्यात आला आहे.
शांघाय येथील प्रशिक्षण केंद्रात 30 मे रोजी 19 वर्षाखालील वयोगटातील हे सहा फुटबॉलपटू परवानगी न घेता बाहेर मद्यसेवनासाठी गेल्याचे आढळून आले. त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. संघाच्या शिस्तपालन नियमावलीचे उल्लंघन झाल्याने चीनच्या फुटबॉल संघटनेने या सहा फुटबॉलपटूंवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त झीन्हुआ वृत्तसंस्थेने दिले आहे. सीएफएतर्फे आयोजिलेल्या सर्व सामन्यांमध्ये या दोषी सहा फुटबॉलपटूंना 30 नोव्हेंबरपर्यंत सहभागी होता येणार नाही. या दोषी फुटबॉलपटूंपैकी तीन फुटबॉलपटूंचे मानधन संबंधित फुटबॉल क्लबने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.