2600 वर्षांपूर्वी तयार करण्यात आले पहिले नाणे
चीनमध्ये जगातील सर्वात जुन्या नाणे तयार करणाऱया टांकसाळीचा (कॉइन मिंट) शोध लागला आहे. ही टांकसाळ 640 ते 550 ख्रिस्तपूर्व काळातील आहे. सुमारे 2600 पेक्षा अधिक वर्षांपूर्वी तेथे धातूचे नाणे तयार करण्यात आले होते. हे ठिकाण ‘पहिल्या धातूच्या चलना’चे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्यास सक्षम होते असे पुरातत्व तज्ञांचे म्हणणे आहे.
झेंग प्रांतातील गुआनजुआंग शहरात उत्खननादरम्यान याचा शोध लावला आहे. संशोधकांना नाण्याचे तुकडे, धातूचे अवशेष आणि कित्येक वापरण्यात आलेले नाण्याचे साचे मिळाले आहेत. टांकसाळ अत्यंत संघटित होती आणि स्पेड कॉइन्सचे उत्पादन करत होती असे परीक्षणाच्या निष्कर्षांमधून समजते.
कुदळीसारख्या आकारामुळे या नाण्यांना हे नाव मिळाले आहे. कुदळीची नाणे सर्वात जुने ज्ञात चिनी धातू चलन आहे. बहुधा जगात पहिल्यांदा 7500-500 ख्रिस्तपूर्व वर्षांदरम्यान ती तयार केली असावीत. 221 ख्रिस्तपूर्वमध्ये चीनच्या पहिल्या सम्राटाने ही नाणी संपुष्टात आणली होती. त्यापूर्वी झेंग आणि नजीकच्या क्षेत्रांमध्ये त्यांचा वापर व्हायचा.
गुआनजुंआग टांकसाळ सुमारे 770 ख्रिस्पूर्व वर्षामध्ये सुरू झाली होती. प्रामुख्याने तेथे जहाज, शस्त्रास्त्रs आणि उपकरणांचे उत्पादन व्हायचे. सुमारे 150 वर्षांनी तेथे नाणे तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. गुआनजुआंग टांकसाळच्या रेडिओकार्बन डेटिंगद्वारे ती 640-550 ख्रिस्तपूर्वदरम्यान काही काळासाठी सुरू झाली होती असे समजत असल्याचे उद्गार संशोधनाचे प्रमुख लेखक आणि झेंग्झो विद्यापीठाचे तज्ञ डॉ. हाओ झाओ यांनी काढले आहेत. हेनान प्रांतातील हे नवे ठिकाण चलनाचा इतिहास आणि त्याच्या विकासावर क्रमावर प्रकाश टाकेल अशी अपेक्षा संशोधकांना आहे.