विद्यापीठ परिसर सील – 1500 विद्यार्थी आयसोलेट
वृत्तसंस्था/बीजिंग
जगभरात कोरोना विषाणू फैलावण्यास कारणीभूत असलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा महामारीचा प्रकोप दिसून येतोय. चीनच्या एका विद्यापीठात कोरोनाचे संक्रमण वाढल्यावर तेथील सुमारे 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना हॉटेल्समध्ये आयसोलेट करण्यात आले ओ.
चीनच्या दालियान प्रांताच्या नॉर्थ-वेस्टर्न सिटीमधील झुंगाझे विद्यापीठात रविवारी अनेक कोरोनाबाधित सापडले होते. त्यानंतर विद्यापीठ परिसर सील करण्यात आला असून विद्यार्थ्यांना देखरेखीसाठी हॉटेलमध्ये पाठविण्यात आले आहे. विद्यार्थी तेथूनच ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होत आहेत. त्यांना खोलीतच जेवण पुरविण्यात येत आहे.
चीन सातत्याने कोरोनावरून झिरो टॉलरन्सचे धोरण अंमलात आणत राहिला आहे. कोरोनाचे काही रुग्ण सापडल्यावर चीन संबंधित भागात त्वरित लॉकडाउन लागू करत आहे. क्वारेंटाईन, टेस्टिंग आणि प्रवासावर निर्बंध तेथील बहुतांश लोकसंख्येसाठी आता सवयीचेच झाले आहेत. चीनमध्ये कोरोनाविरोधी लसीकरण मोहीमही वेगाने सुरू आहे. जगातील सर्वाधिक डास देण्यात आल्याचा दावा चीनकडून केला जातो. याचबरोबर तेथे आता बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू आहे.
कोरोना संक्रमण फैलावण्यापासून रोखण्यासाठी चीनकडून अनेक प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत. राजधानी बीजिंगमध्ये संक्रमण रोखण्यासाठी आता देशाच्या कुठल्याही हिस्स्यातून येणाऱया प्रवाशांना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बाळगावा लागणार आहे. हा अहवाल 48 तासांच्या कालावधीतील असणे आवश्यक आहे.