राजधानी बीजिंगमधील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन, बाजारपेठा बंद, लोकांना घरातच राहण्याचा आदेश
वृत्तसंस्था / बीजिंग
कोरोनाचे उगमस्थान असणाऱया आणि कोरोना नियंत्रणाखाली आणल्याचा दावा केलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा या विषाणूचा झपाटय़ाने प्रसार होताना दिसत आहे. कोरोनाची जागतिक राजधानी मानल्या जाणाऱया वुहान प्रांतातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असली तरी बीजिंगमध्ये त्याची लागण वेगाने होत आहे. सोमवारी एकाच दिवसात राजधानीच्या या शहरात 67 नवे रुग्ण आढळले आहेत. 67 ही संख्या तुलनेने अल्प भासत असली तरी प्रत्यक्षात या विषाणूचा प्रसार अधिक प्रमाणात असल्याची शक्मयता व्यक्त होत आहे. बीजिंगसह चीनमध्ये एकंदर 100 नवे रुग्ण रविवार संध्याकाळ ते सोमवार संध्याकाळ या 24 तासात नोंद करण्यात आले आहेत.
चाचण्यांचे प्रमाण वाढविले
बीजिंग आणि परिसरात चिनी प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवून ते दुपटीहून अधिक केले आहे. एक दिवसात या शहरात 29 हजार 386 चाचण्या झाल्या असून येथील प्रसिद्ध झिनफदी बाजारपेठेत कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव झाला असून या बाजारपेठेला भेट दिलेल्या ग्राहकांची चाचणी घेण्यात येत आहे.
आठवडय़ाभरात 700 रुग्ण
बीजिंगमध्ये गेल्या आठवडय़ात एकंदर 700 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नसल्याचे बीजिंगच्या वैद्यकीय अधिकाऱयांनी म्हटले आहे. रुग्णांपैकी 500 हून अधिक जणांना स्थानिक संक्रमणातूनच बाधा झाली असल्याने हा अधिक चिंतेचा विषय असल्याचे चिनी प्रशासनाने स्पष्ट केले. बाधितांच्या संपर्कात आलेल्या 4 हजारहून अधिक जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांचे बारकाईने निरीक्षण सुरू आहे.
चिनमध्ये आतापर्यंत 83 हजार 181 रुग्ण आढळले असून 78 हजार 370 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 4 हजार 634 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नेपाळमध्ये विमान प्रवासावर बंदी कायम
काठमांडू :
कोरोना विषाणूचा वाढता उदेक लक्षात घेता नेपाळ सरकारने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी 5 जुलैपर्यंत वाढविली आहे. नेपाळमध्ये रुग्णसंख्या 6 हजारचा आकडा पार करून गेली असून 450 नवे बाधित आढळले आहेत. बरे झालेल्यांची एकंदर संख्या 1 हजार 41 असून मृतांची संख्या 19 इतकी आहे. गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या दुप्पट झाल्याने प्रशासन चिंतेत आहे.
पाक पंजाबमध्ये मृत्यूसंख्या हजार पार
लाहोर :
1 हजाराहून अधिक कोरोना मृत्यू नोंद करणारा पंजाब प्रांत हा पाकिस्तानातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त प्रांत ठरला आहे. सोमवारी एका दिवसात कोरोनाबाधेमुळे 62 जणांचा मृत्यू ओढवला. तर 1 हजार 537 नवे रुग्ण या प्रांतात आढळून आले. त्यामुळे प्रांतातील एकंदर रुग्णसंख्या 53 हजार 721 इतकी झाली आहे. पाकमध्ये सोमवारी दिवसभरात 5 हजार 600 नवे रूग्ण आढळले आहेत. विभागांमध्ये सोमवारपासून पंधरा दिवसांचा वाढीव लॉकडाऊन घोषित केला. पाकिस्तान सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका अतिरंजित असल्याचा दावा त्यांनी केला. पाकिस्तानात 24 तासांत 5 हजार नवे रुग्ण आढळल्याने एकंदर आकडा 1 लाख 44 हजार 676 पर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत 97 लोकांना प्राण गमवावे लागले असून एकंदर मृत्यूसंख्या 2 हजार 729 आहे.
सिंगापूरमध्ये परिस्थिती बरीच नियंत्रणात
सिंगापूर
सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवडय़ात पाचशे नवे रुग्ण आढळले होते. तथापि, गेल्या चार दिवसात ही संख्या 214 वर आली आहे. कोरोनाची बाधा होणाऱयांमध्ये विदेशी कर्मचाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून त्यांना स्थानिक नागरिकांपासून वेगळे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कर्मचाऱयांसाठी स्वतंत्र विलगीकरण आहे.
ब्रिटनमध्ये अनेक निर्बंध सोमवारपासून शिथिल
लंडन :
साधारणतः तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर ब्रिटनमध्ये दुकाने उघडण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे गजबजलेल्या इंग्लंड भागातील बाजारपेठा पुन्हा ग्राहकांनी फुलल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीबरोबरच चैनीच्या वस्तू घेण्याकडेही लोकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा जोर धरेल, अशी अपेक्षा ब्रिटिश प्रशासनाने व्यक्त केली. ब्रिटनमध्ये रुग्णसंख्या मात्र अजूनही वाढत असून मृतांच्या संख्येतही दररोज सरासरी 200 ची भर पडत आहे. आणखी एक महिन्यात परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
हाँगकाँगमध्ये डिस्नेलँड खुले होणार
हाँगकाँग
चीनचा भाग असलेल्या मात्र स्वायत्तता असणाऱया हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डिस्नेलँड हे मनोरंजन पार्क बंद करण्यात आले आहे. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याने ते 18 जूनपासून खुले करण्यात येईल, असे सांगण्यात आले. प्रारंभी केवळ स्थानिकांनाच प्रवेश देण्यात येईल. हे डिस्नेलँड पार्क जगप्रसिद्ध असून जगभरातून अनेक पर्यटक ते पाहण्यासाठी हाँगकाँगला जातात. त्यामुळे त्याचे जागतिक महत्त्व आहे. गेल्या महिन्यात चीनमधील शांघाय या आणखी एका मोठय़ा शहरातील डिस्नेलँड खुले करण्यात आले होते. या मनोरंजन पार्कला भेट देणाऱयांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम कसोशीने पाळावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.