वृत्तसंस्था/ जिनिव्हा
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चीनच्या सायनोफार्म कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. डब्ल्यूएचओने शुक्रवारी रात्री उशिरा यासंबंधी माहिती दिली आहे. फिलिपाईन्सने एका दिवसापूर्वीच या लसीचे हजार डोस परत घेण्यास चीनला सांगितले होते. चीनने ही मान्यता नसलेली लस अनेक देशांना मदतीदाखल पुरविली होती. यात पाकिस्तानही सामील आहे. पण बहुतांश देशांमधील लोक ही लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. चीनने अद्याप स्वतःच्या केवळ दोन लसींना मंजुरी दिली आहे. दुसऱया लसीचे नाव सायनोवॅक आहे.
चीनच्या लसीला मान्यता देण्यास कित्येक महिने का लागले आणि या लसीची प्रभावोत्पादकता किती हे मात्र डब्ल्यूएचओने स्पष्ट केलेले नाही. आपत्कालीन वापराची मंजुरी मिळालेल्या लसींच्या यादीत सायनोफार्मला सामील केले आहे. ही लस बीजिंगमध्ये तयार होते. जगातील 6 लसींना आतापर्यंत मंजुरी दिली आहे. त्यांची सुरक्षितता, प्रभावोत्पादकता आणि गुणवत्तेची तपासणी करण्यात आली आहे. या सर्व लसी मानकांची पूर्तता करत असल्याचे विधान डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस एडेनहोम गेबेसियस यांनी केले आहे.
लसीकरणात सुलभता
जगातील सर्वच देशांपर्यंत लस पोहोचावी याकरता प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. सर्व देशांच्या नियामकीय यंत्रणा या लसींच्या गुणवत्तेने समाधानी होतील आणि गरजेनुसार आयात करतील अशी अपेक्षा असल्याचे टेड्रोस म्हणाले.
चीनमध्ये 16 लसींवर संशोधन चीनमध्ये कोरोनावरील 16 लसींचे संशोधन आणि विकास सुरू आहे. यातील 2 लसींना मंजुरी मिळाली आहे. चीनने अनेक छोटय़ा देशांना लस पुरविली आहे. पण फिलिपाईन्समध्ये चीनच्या सायनोफार्म लसीवरून वाद निर्माण झाला आहे. फिलिपाईन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुर्तेते यांनी जाहीरपणे ही लस टोचून घेतल्यावर त्यांच्यावर टीका होऊ लागली. यानंतर त्यांनी देशाच्या लोकांची मंजुरी न मिळालेली लस घेण्यासाठी माफी मागितली आहे. याचबरोबर फिलिपाईन्स सरकारने चीनकडून ही लस मागे घेण्यास सांगितले आहे. डब्ल्यूएचओने मंजुरी दिली असली तरीही फिलिपाईन्सच्या नियामकीय यंत्रणेने याला हिरवा झेंडा दाखविण्यास नकार दिला आहे.