बीजिंग ऑलिम्पिकवर अमेरिकेचा ‘राजनयिक बहिष्कार’
ऑनलाईन टीम/तरुण भारत
चीन संपूर्ण जगावर वरचढ होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर चीनसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहात असताना चीन मात्र अजूनही आपला हेकेखोर स्वभाव सोडण्यास तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून तैवानच्या मुद्द्यावरून चीन विरोधी जागतिक महासत्ता असं काहीसं चित्र निर्माण झालं आहे. तैवानवर अतिक्रमण करण्याच्या तयारीत असलेल्या चीनला अमेरिकेसबतच जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांनी विरोध करत तैवानच्या बाजूने युद्धात उतरण्याची तयारी चालवली आहे.
बिजिंग आणि शिनजियांग प्रांतामध्ये उग्यूर आणि तुर्की भाषिक मुस्लिमांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याची टीका केली जात आहे. या प्रकाराचा निषेध केला जात आहे. मात्र, चीन याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने यासंदर्भात मोठं पाऊल उचलत २०२२ साली बिजिंगमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांवर डिप्लोमॅटिक बहिष्कार अर्थात आपले राजनैतिक अधिकारी या स्पर्धेला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेने बीजिंगमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक 2022 मध्ये स्वतःच्या अधिकाऱ्यांना पाठविणार नसल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने आक्षेप घेत प्रत्युत्तरादाखल कारवाईची धमकी दिली आहे. अमेरिकेचे हे कृत्य राजनयिक दृष्टय़ा प्रक्षोभक कारवाई असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर चीनसोबत तणावपूर्ण संबंध झालेले असताना ऑस्ट्रेलियानं देखील अमेरिकेच्याच पावलावर पाऊल ठेवलं आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. “देशाच्या हितासाठी ऑस्ट्रेलियानं घेतलेल्या ठाम भूमिकेपासून आम्ही अजिबात मागे हटणार नाही. आणि यात कोणतंही आश्चर्य नाही की आम्ही ऑस्ट्रेलियाचे राजनैतिक अधिकारी बिजिंग ऑलिम्पिक्ससाठी पाठवणार नाही”, असं पंतप्रधान मॉरिसन यांनी स्पष्ट केलं आहे.