पुढील महिन्यात भारत, जपान, ऑस्ट्रेलियातसोबत व्यूहनीत आखणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
दक्षिण चीन समुद्रासमवेत जगातील अनेक हिस्स्यांमध्ये चीनच्या भूमिकेला अमेरिकेने अत्यंत आक्रमक ठरवत त्याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीवर भर दिला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे अधिकारी मिळून व्यूहनीती तयार करणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी दिली आहे. चीनची भूमिका अत्यंत आक्रमक असून त्याला कसे हाताळावे हे अमेरिका जाणून असल्याचे ब्रायन म्हणाले.
अधिकाऱयांच्या बैठकीपूर्वी विदेशमंत्री माइक पॉम्पियो हे भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या विदेश मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत बैठकीचा अजेंडा निश्चित होणार आहे. हिंदी महासागरातील चिनी आगळीकी सहन केल्या जाऊ शकत नसल्याचे ब्रायन यांनी म्हटले आहे.
चीनला घेरणार
हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रातील चिनी कारवायांचा अचूकपणे बीमोड केला जाणार आहे. अमेरिका याप्रकरणी मोठी भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. आम्ही कूटनीतिक, सैन्य आणि आर्थिक स्तरावर या संघर्षाची व्यूहनीती तयार करणार आहोत. चीनला स्वतःच्या कृत्यांचा फटका बसणार असल्याचे ब्रायन यांनी सांगितले आहे.
समुद्रावर चीनचा हक्क नाही
जगाच्या कुठल्याही सागरी क्षेत्राला चीन स्वतःचे ठरवू शकत नाही. सागरी क्षेत्राच्या वापराचा अधिकार सर्वांनाच आहे. हवाईहद्दीप्रकरणी आम्ही असेच स्वातंत्र्य बाळगतो. याच कारणामुळे सागरी मार्गातील वाहतुकीत कुठलेच अडथळे उभे करता येणार नाहीत. परंतु अशाप्रकारचा कट झाल्यास अमेरिका आणि त्याचे सहकारी प्रत्युत्तर देणे जाणत असल्याचे ब्रायन यांनी म्हटले आहे.