भारत दौऱयापूर्वी पंतप्रधान करणार मोठी घोषणा
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान शेरबहादुर देउबा हे स्वतःच्या भारत दौऱयापूर्वी चीनला मोठा झटका देण्याची तयारी करत आहेत. शेरबहादुर देउबा यांनी अमेरिकेच्या ‘मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन’मध्ये सामील होण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. 50 कोटी डॉलर्सचा कार्यक्रम नेपाळच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. चीन स्वतःचे कर्जाचे जाळे म्हणजेच बेल्ट अँड रोड प्रकल्प नेपाळमध्ये राबविण्यासाठी जोर लावलेला असताना देउबा यांनी हे विधान केले आहे. अमेरिकेच्या एमसीसी कार्यक्रमाला चीनचा विरोध आहे.
नेपाळचे पंतप्रधान देउबा यांनी सर्व राजकीय पक्षांदरम्यान सहमती निर्माण करत ‘मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन’ (एमसीसी) अंतर्गत अमेरिकेच्या प्रस्तावित अनुदान मदत स्वीकारण्यासाठीची आवश्यकता अधोरेखित केली आहे. एमसीसी कार्यक्रम राष्ट्रीय हिताच्या विरोधात नसल्याचे त्यांनी म्हटले. नेपाळचे राजकीय पक्ष एमसीसी कराराच्या अंतर्गत अमेरिकेचे अनुदान स्वीकारण्याच्या मुद्दय़ावर विभागले गेले आहेत.
भारताला होणार लाभ
नेपाळ आणि अमेरिकेने 2017 मध्ये एमसीसी करारावर स्वाक्षरी केली होती. एमसीसी कार्यक्रमाच्या अंतर्गत अमेरिका अनुदान प्रदान करणार असून याचा वापर प्रामुख्याने नेपाळच्या वीजवहन यंत्रणेला मजबूत करण्याकरता केला जाणार आहे. ही यंत्रणा नजीकच्या भविष्यात भारताला जलविद्युत ऊर्जेची निर्यात करण्याची सुविधा प्रदान करणार आहे. देशातील रस्त्यांच्या जाळय़ातही सुधारणा केली जाणार आहे.
चीन अन् अमेरिकेतील स्पर्धा
मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन ही 2004 साली अमेरिकन काँग्रेसकडून स्थापन एक द्विपक्षीय अमेरिकन विदेशी सहाय्य संस्था आहे. एमसीसी कार्यक्रमाच्या विरोधात नेपाळमध्ये वातावरण निर्मिती करण्यासाठी चीन मोठय़ा प्रमाणावर रक्कम खर्च करत असल्याचा आरोप वारंवार होत असतो.
देउबा अन् मोदी यांच्यात चर्चा
पंतप्रधान देउबा पुढील महिन्यात ‘वायब्रेंट गुजरात ग्लोबल समिट’मध्ये भाग घेण्यासाठी भारताच्या दौऱयावर येणार आहेत. यादरम्यान देउबा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू शकतात. दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे आयोजन 10-12 जानेवारीदरम्यान होणार आहे.