अमेरिकेतही ‘बॉयकॉट चायना’चा आवाज : भारताचे धक्कातंत्रही सुरूच : फिलिपाईन्सनेही दिला इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पूर्व लडाखमध्ये भारताचा चीनशी संघर्ष सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही चीनवर दबाव वाढत चालला आहे. केवळ अमेरिकाच नाही, तर जगातील अन्य देशही आता भारताचे समर्थन करत असून चीनची कोंडी करण्यासाठी सक्रीय झाल्याचे दिसत आहे. त्यातच चीनच्या अध्यक्षांचा नियोजित जपान दौराही रद्द होण्याच्या मार्गावर असून त्याचा संबंधही भारत-चीन तणावाशी जोडला जात आहे. दुसरीकडे फिलिपाईन्सनेही ‘युद्धाभ्यास थांबवा अन्यथा गंभीर परिणाम होतील’ असा इशारा चीनला दिल्याने चीनची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेल्या लेह-लडाख दौऱयानंतर दोन्ही देशांमधील तणावाचा मुद्दा आणखीनच चर्चेचा बनला आहे. पंतप्रधानांनी सुरक्षेचा आढावा घेत तणावग्रस्त भागातील सैनिकांचे मनोबल वाढवले. तसेच चीनला अप्रत्यक्षपणे दिलेल्या इशाऱयानंतर चीनने सावध पवित्रा घेतल्याचे दिसते. मोदींप्रमाणेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीपासूनच चीनला धारेवर धरले आहे. चीनने कोरोना विषाणूचा प्रसार केल्याचा आरोप त्यांनी यापूर्वीच केला आहे. तसेच एलएसीवरील वादासाठी चीन पूर्णपणे जबाबदार असल्याचेही अमेरिका वारंवार म्हणत आहे. याशिवाय अमेरिकेने भारताच्या ऍप बंदी निर्णयाचेही स्वागत केले आहे.
पंतप्रधानांच्या दौऱयामागे डोवालांची रणनीती
पंतप्रधानांनी शुक्रवारी लडाख दौरा केला. त्यांच्या दौऱयापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे लडाख दौऱयावर जाणार असे सांगितले जात होते. मात्र लडाखमध्ये अचानक मोदीच दाखल झाले होते. मोदींच्या या भेटीमागील संपूर्ण रणनीती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आखल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान विमानतळावर उतरेपर्यंत त्यांच्या या दौऱयाची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. मोदींच्या या दौऱयाची माहिती केवळ अजित डोवाल, बिपिन रावत आणि मुकुंद नरवणे यांनाच होती.
अमेरिकेत जोरदार घोषणाबाजी
भारत आणि चीन यांच्यात सीमावादावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेतही आवाज बुलंद होत चालला आहे. शनिवारी न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरमध्ये अमेरिकन-भारतीयांनी आवाज उठवत ‘बॉयकॉट चायना’ची नारेबाजी केली. यावेळी उपस्थितांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची जोरदार मागणी केली. भारताच्या आक्रमक पवित्र्याला अमेरिकेकडूनही पाठबळ मिळत असल्याने आता अमेरिकतही लोक रस्त्यावर उतरून चीनविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत.
फिलिपाईन्सचा चीनला इशारा
आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आता चारही बाजूंनी अडकत असल्याचे दिसत आहे. भारतानंतर आता फिलिपाईन्सने चीनला इशारा देत चीनने विवादित दक्षिण चीन समुदातील युद्धाभ्यास सुरूच ठेवल्यास याचे गंभीर परिणाम होतील, असे फिलिपाईन्सने म्हटले आहे. चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीचा एक गट 1 जुलैपासून पेरासेल द्वीपसमूहाच्या बाहेर युद्धाभ्यास करत आहे. या पार्श्वभूमीवर आता चीनने तणाव कमी करणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत जबाबदारीचे पालन करणे आवश्यक असल्याचेही फिलिपाईन्सने म्हटले आहे.
‘हिरो’ सायकलकडून चीनचे 900 कोटींचे कंत्राट रद्द
भारत सरकारकडून चीनशी असलेले करार रद्द केले जात असतानाच हिरो सायकलने चीनशी केलेले 900 कोटींचे कंत्राटही रद्द करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. चीनऐवजी आता जर्मनीतील प्रकल्पाशी जुळवून घेण्याचा विचार हिरो कंपनीकडून सुरू आहे. तसेच सायकलचे विविध भाग बनवणाऱया लुधियानामधील काही कंपन्यांच्या संपर्कातही ‘हिरो’ कंपनीचे प्रशासन असल्याचे समजते.
चीनला हितकारक ठरणारे नियम बदलणार : गडकरी
देशात असे अनेक कालबाहय़ नियम आहेत आणि त्यामुळे चिनी कंपन्यांचा त्याची मदत होत आहे. राष्ट्रीय हित आणि भारतीय कंपन्यांच्या हितासाठी जुन्या नियम आणि कायद्यांमध्ये सुधारणा केली जाणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी भारताच्या चीनविरोधी पवित्र्याचे समर्थन केले.
फ्रान्स, जपानचेही भारताला पाठबळ
चीनशी झालेल्या संघर्षात भारताला फ्रान्सचेही पाठबळ मिळाले आहे. फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी राजनाथ सिंह यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. फ्रान्सकडून 36 राफेल विमान खरेदी करण्याच्या करारावरही भारताने करार केला आहे. जपाननेही सीमावादावर भारताला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच दक्षिण-पूर्व आशियाई देशांच्या (आसियान) नेत्यांनी दक्षिण चीन समुद्रावरून चीनविरोधात कठोर भाष्य केले आहे.