वृत्तसंस्था/ टोकियो
दक्षिण चीन समुद्रात डॅगनच्या वाढत्या अरेरावीच्या विरोधात जपान आता नवी आघाडी उघडत आहे. पुढील वर्षी मे महिन्यात अमेरिका आणि फ्रान्सच्या नौदलासोबत जपान स्वतःच्या एका बेटानजीक व्यापक युद्धाभ्यास करणार आहे. जपानने यापूर्वी अमेरिका आणि फ्रान्ससोबत कधीच त्रिपक्षीय युद्धाभ्यास केला नव्हता. अलिकडच्या काळात जपानी क्षेत्रात चिनी नौदल आणि वायुदलाच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे.
हा युद्धाभ्यासादरम्यान तिन्ही देशांचे नौदल नैसर्गिक आपत्तीदरम्यान बचाव तसेच मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेणार आहे. परंतु याचा मुख्य उद्देश चीनच्या विरोधात संरक्षणात्मक तयारीला चालना देणे हाच असल्याचे जाणकारांचे मत आहे.
चीनला संदेश देण्याचा हेतू
या संयुक्त युद्धाभ्यासाचा उद्देश पूर्व चीन समुद्रात जपानकडून नियंत्रित बेटांचे रक्षण करणे असल्याचा दावा आहे. तर फ्रान्सच्या नौदलाचे प्रमुख ऍडमिरल पियरे वांडियर यांनी या क्षेत्रात उपस्थिती दर्शवू पाहत असून यातून जपान-फ्रान्स सहकार्याचा संदेश मिळणार असल्याचे उद्गार काढले आहेत.