कोरोना उत्पत्तीचा मुद्दा – डब्ल्यूएचओलाही क्लीनचिट मिळणे अवघड
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी देशाच्या गुप्तचर संस्थांना कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचे सत्य शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. याकरता त्यांनी 90 दिवसांची मुदत दिली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडे लॅब लीक किंवा चिनी कटाशी संबंधित काही नवी माहिती असल्याचा दावा एका प्रसारमाध्यमाने केला आहे.
अध्यक्ष बायडेन यांनी जाहीरपणे नव्या चौकशीची घोषणा करण्यामागे हीच नवी माहिती असल्याची चर्चा आहे. पण तपास यंत्रणांदरम्यानही कोरोनाच्या उत्पत्तीवरून चित्र स्पष्ट नाही.
चीनमध्ये कोरोना संसर्गाची सुरुवात नोव्हेंबर 2019 च्या पूर्वीच झाली होती. काही संशोधक आजारी पडले होते असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या फॅक्ट शीटमध्ये म्हटले गेले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनेही तीन दिवसांपूर्वी असाच दावा केला होता. विदेश मंत्रालयाचा अहवाल ट्रम्प प्रशासनाने तयार करविला होता आणि तो जानेवारीत प्रसिद्ध करण्यात आला होता.
तर चीननुसार पहिला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये सापडला होता. डिसेंबरच्या कित्येक महिन्यांपूर्वीच विषाणू सक्रीय झाला होता असे अमेरिकेचे मानणे आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, स्वीडनसह पॅरिस ग्रूप ऑफ रिसर्चर्स देखील याच दिशेने इशारा करत आहेत.
चौकशीत कुठलीच नवी माहिती किंवा तपशील न मिळण्याचीही शक्यात आहे. पण असे घडले तर तर केवळ चीनमुळे घडणार आहे. कारण चीनकडून सहकार्य मिळणे अवघड आहे. पण यातून भविष्यातील महामारींना तोंड देण्याची तयारी करू शकतो. चीनने जागतिक आरोग्य संघटनेसमोर कशाप्रकारे सत्य लपविले ही बाब स्पष्ट होऊ शकते असे बायडेन प्रशासनातील एका अधिकाऱयाने म्हटले आहे. पण लॅब लीक गृहितावर मतमतांतरे आहेत. बायडेन यांनी मार्च महिन्यातच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान यांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास गुप्तचर यंत्रणांना सांगण्याचा आदेश दिला होता.
सीएनएनचा खुलासा
अमेरिकेतील वृत्तवाहिनी सीएनएनने कोरोना उत्पात्तीवर एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यात गुप्तचर यंत्रणांच्या दाखल्याने चीनबद्दल मोठा खुलासा करण्यात आला होता. मांसबाजारातून कोरोना विषाणू फैलावल्याचा चीनचा दावा खोटा आहे. हा विषाणू मांसबाजार नव्हे तर चीनच्या एका प्रयोगशाळेतून पसरल्याचे सीएनएने म्हटले आहे. पण चीनने नेहमीप्रमाणे हा अहवालही फेटाळला आहे.