मालाबार सागरी युद्धाभ्यासाची तयारी पूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू महिन्याच्या अखेरीस भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे नौदल प्रशांत महासागरात युद्धाभ्यास करणार आहे. मालाबार सागरी युद्धाभ्यासाची तयारी आता पूर्ण झाली आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी यंदा होणार हा युद्धाभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील वर्षी हा युद्धाभ्यास बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात पार पडला होता. 13 वर्षांनी ऑस्ट्रेलियाने या युद्धाभ्यासात भाग घेतला होता.
दर 2 वर्षांनी होणाऱया ‘तालिसमेन सेबर’ या स्वतःच्या सर्वात मोठय़ा युद्धाभ्यासात भारताने 2023 मध्ये भाग घ्यावा अशी ऑस्ट्रेलियाची इच्छा आहे. 2021 मध्ये झालेल्या या युद्धाभ्यासात 17 हजार नौसैनिक, 18 युद्धनौका, 70 विमाने आणि 50 हेलिकॉप्टर्सनी भाग घेतला होता. यात ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, ब्रिटन, कॅनडा, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडचा सहभाग होता.
मालाबार सागरी युद्धाभ्यासाचा प्रारंभ 1992 मध्ये झाला होता. त्यावेळी अमेरिका आणि भारताचे नौदल यात सामील व्हायचे. त्यानंतर 2015 आणि 2020 मध्ये जपानचे नौदल यात सहभागी झाले. मागील वर्षी ऑस्ट्रेलियानेही यात भाग घेतला. या युद्धाभ्यासात सर्व क्वाड देश सामील होण्याची ही दुसरीच वेळ असणार आहे.
फ्रान्स अन् ब्रिटनची साथ
चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी क्वाड देशांनी स्वतःच्या हालचाली वाढविल्या आहेत. हे सर्व दश हिंद-प्रशांत महासागरातील मुक्त संचाराचे समर्थक आहेत. क्वाडसोबत फ्रान्सही मुक्त संचाराकरता आग्रही आहे. तसेच ब्रिटनही चीनच्या विरोधात उभा ठाकला आहे. ब्रिटनने मागील आठवडय़ातच पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांसह स्वतःची एलिझाबेथ ही विमानवाहू नौका दक्षिण चीन समुद्रात पाठविली होती. चीनचा यामुळे जळफळाट झाला होता.
भारताचे मोठे पाऊल
भारत देखील स्वतःच्या ऍक्ट ईस्ट धोरणाच्या अंतर्गत एक नौसैनिक टास्कफोर्स पश्चिम प्रशांत क्षेत्र, दक्षिणपूर्व आशिया आणि दक्षिणपूर्व समुद्रात पाठविणार आहे. यात दिशानिर्देशित क्षेपणास्त्र नष्ट करणारी आयएनएस रणविजय, आयएनएस शिवालिक युद्धनौका, आयएनएस कदमातसोबत आयएनएस कोरा या युद्धनौकेचा समावेश आहे.