आक्रमक भूमिका आणि विस्तारवादी धोरणांमुळे चीनची आशियातच कोंडी सुरू झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव असताना पूर्व चीन समुद्रात बेटांवरून ड्रगनने जपानशी भांडण उकरून काढले आहे. याचदरम्यान भारतीय आणि जपानच्या नौदलाने हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी संयुक्त युद्धाभ्यास केला आहे.
27 जून रोजी जपान मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सच्या जेएस काशिमा आणि जेएस शिमायुकी या नौकांनी भारतीय नौदलाच्या आयएनएस राणा आणि आयएनएस कुलीशसोबत हिंदी महासागरात युद्धसराव केला आहे. या सरावाद्वारे जपान मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सने भारतीय नौदलासोबतचे सहकार्य वाढविले आहे.
जपानच्या कागा या युद्धनौकेने ओकिनावा बेटानजीक 24 सागरी मैलाच्या क्षेत्रात एका चिनी पाणबुडीचा थांगपत्ता लावला होता. जपानच्या नौदलाने स्वतःयच टेहळणी विमानाच्या मदतीने चिनी पाणबुडीला स्वतःच्या सागरी हद्दीतून हुसकावून लावले होते. 2018 मध्येही जपानने स्वतःच्या सागरी हद्दीत दाखल झालेल्या एका चिनी पाणबुडीला पळ काढण्यास भाग पाडले होते.
बेटांवरून चीनशी वाद
चीन आणि जपानमध्ये पूर्व चीन समुद्रातील बेटांवरून वाद आहे. दोन्ही देश या निर्जन बेटांवर स्वतःचा दावा करत आहेत. या बेटांना जपानमध्ये सेनकाकू तर चीनमध्ये डियाओस या नावाने ओळखले जाते. या बेटांचे प्रशासन 1972 पासूनच जपानकडे आहे. तर हे बेट आपल्या अधिकारक्षेत्रात येत असल्याचा दावा चीनने केला आहे. तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने या बेटावर कब्जा करण्यासाठी सैन्य कारवाईची धमकी दिली आहे.
चीनची अरेरावी
आशियात चीनच्या विस्तारवादी धोरणांमुळे भारताला सर्वाधिक धोका आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे चिनी सैन्याच्या जमवाजमवीवरून मिळाले आहे. याचबरोबर चीनचा जपानशी असलेला तणाव टोकाला पोहोचला आहे. चीनने अनेकदा तैवान विरोधात सैन्यबळाचा वापर करण्याची धमकी दिली आहे. मागील काही दिवसांमध्ये चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाईक्षेत्राचे अनेकदा उल्लंघन केले आहे. तर चीनचा फिलीपाईन्स, मलेशिया, इंडोनेशियासोबत देखील वाद आहे.