तैवानच्या अध्यक्षांनी क्षी जिनपिंग यांना सुनावले
वृत्तसंस्था/ तैपैई
तैवानवर कब्जा करण्याची धमकी देणाऱया चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग वेन यांनी चांगलेच सुनावले आहे. तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रविवारी त्साई यांनी आम्ही चीनसमोर झुकणार नाही आणि आमच्या देशाची संरक्षण क्षमता सातत्याने वाढवत राहू असे उद्गार काढले आहेत. चीनने आखून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी कुणीच आम्हाला भाग पडू शकणार नाही हे देखील निश्चित करणार आहोत असे त्या म्हणाल्या.
तैवान आणि चीन यांच्यात युद्धसदृश स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत असताना त्साई यांनी हे विधान केले आहे. या धोकादायक वातावरणात तैवानने रविवारी स्वतःच्या राष्ट्रीय दिनी स्वतःच्या एकजुटतेसह शक्तिप्रदर्शनही केले. आम्ही आमची राष्ट्रीय सुरक्षा सातत्याने वाढवत राहू आणि स्वतःची सुरक्षा स्वतः करण्याची प्रतिबद्धता दाखवून देऊ, असेही त्साई यांनी म्हटले आहे.
संबंधांमध्ये मोठा तणाव
चीन दाखवू पाहणाऱया मार्गात स्वातंत्र्य तसेच लोकशाहीचा लवलेशही दिसून येत नाही. मागील 72 वर्षांमध्ये चीन आणि तैवानचे संबंध पहिल्यांदाच इतके जटिल झाले असल्याचे त्या म्हणाल्या. चीनने तैवानवरील सैन्य तसेच राजनयिक दबाव वाढविला असताना त्साई यांचे हे विधान समोर आले आहे. चिनी वायुदलाची लढाऊ विमाने तैवानच्या हवाई सुरक्षा क्षेत्राजवळून घिरटय़ा घालत आहेत. चीन आता तैवानला धमकावत आहे. तैवानचे शांततापूर्ण मार्गाने विलीनीकरण होणार असल्याचे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी शनिवारी म्हटले होते.
चिनी अध्यक्षांचा इशारा
तैवानचा प्रश्न सोडविण्यात येईल आणि शांततापूर्ण एकीकरण दोन्ही बाजूंच्या हिताचे आहे. तैवानच्या मुद्दय़वर कुठल्याही प्रकारचा विदेशी हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचा इशारा क्षी यांनी दिला आहे. चीनची वाढती आक्रमकता पाहता अमेरिका आणि जपानने तैवानसाठीचा स्वतःचा पाठिंबा वाढविला आहे. तैवान स्वतःला एक सार्वभौम देश मानतो, तर चीन त्याच्याकडे एक वेगळा प्रांत म्हणून पाहतो. चीनने एकीकरणासाठी बळाचा वापर करण्याची शक्यता नाकारलेली नाही.