तालिबानची घोषणा, मोठय़ा गुंतवणुकीची अपेक्षा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीन हा आमचा सर्वात महत्वाचा भागीदार देश असून तो अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक करण्यात तयार आहे, असे वक्तव्य तालिबानचे प्रवक्ते हबिबुल्ला मुजाहिद यांनी केले आहे. अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती दयनीय आहे. लोकांची उपासमार होत आहे. अशा स्थितीत चीनची गुंतवणूक या देशाला अपेक्षित आहे, असे मत या वक्तव्यावर अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाला तालिबानचा पाठिंबा आहे. या प्रकल्पातून चीन मध्य आशिया आणि युरोपियन देशांशी भूसंपर्क करणार आहे. या प्रकल्पांतर्गत महामार्ग, रेल्वेचे जाळे, बंदरे आणि औद्योगिक पार्कस् स्थापन केली जाणार आहेत. अफगाणिस्तानही या प्रकल्पाचा एक भाग होऊ इच्छितो, असे तालिबानचे म्हणणे आहे. सरकार स्थापन केल्यानंतर यासंबंधी अधिकृत बोलणी केली जातील, असे तालिबान प्रवक्ताने सूचित केले.
तांब्याच्या खाणी
अफगाणिस्तानात तांब्याच्या खाणी विपुल प्रमाणात आहेत. त्यांमधून तांबे काढून ते जगाच्या बाजारात विकण्याची योजना आहे. याशिवाय इतर दुर्मिळ धातूंच्या खाणीही अफगाणिस्तानात आहेत, असा दावा केला जातो. मात्र, या धातूंचे उत्खनन करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. ते पुरविण्यासाठी अफगाणिस्तानला एका बडय़ा देशाच्या आधाराची आवश्यकता असून तो देश चीन असू शकतो, असेही संकेत देण्यात आले.
चीनचाही प्रतिसाद
चीननेही तालिबानला प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चीनने तालिबानला समर्थन देण्याची भाषा केली होतीं. तालिबानशी चीनची गुप्त बोलणीही सुरु होती. अमेरिकेने यग्ना देशातून आता काढता पाय घेतल्याने चीनला मोकळे रान मिळणार ही अटकळ अनेक तज्ञांनी व्यक्त केली होतीच. त्याप्रमाणेच घडत असल्याचे दिसून येते. चीनने आता अधिकृतरित्या तालिबान राजवटीला मान्यता देण्याची योजना आखली आहे, असेही राजकीय वर्तुळात बोलले जाते.
अफगाणिस्तानबद्दल आदर
चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी अफगाणिस्तानबद्दल चीनला आदर असल्याचे प्रतिपादन केले. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वात चीन हस्तक्षेप करणा नाही. तो खऱया मित्राची भूमिका निभावेल. अफगाणिस्तानच्या सर्व लोकांचा चीन सन्मान करतो. या देशाला आज आर्थिक प्रगतीची आवश्यकता आहे. यासाठी या देशाने खुली आणि सर्वसमावेशक व्यवस्था स्वीकारण्याची आवश्यकता आहे. तसेच सौम्य राजकीय धोरण अंगिकारण्याला प्राधान्य द्यावे, असेही प्रतिपादन चीनच्या विदेश व्यवहार प्रवक्त्यांनी केले.
रशियाही महत्वाचा देश
अफगाणिस्तानसाठी रशिया हे देशही तितकाच महत्वाचा आहे, असे तालिबानच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. रशियाशी सलोख्याचे संबंध तालिबान राजवट ठेवणार असल्याचे मुजाहिद यांनी स्पष्ट केले. रशियग्ना हा भौगोलिकदृष्टय़ा अफगाणिस्तानला जवळचा देश आहे. 80 च्या दशकात रशियाने अफगाणिस्तानावर ताबाही मिळवला होता. त्यावेळी तालिबानने रशिया आपला शत्रू असल्याचे म्हटले होते. तथापि, आता परिस्थिती बदलल्याने मवाळ धोरण स्वीकारण्यात येत आहे.
बॉक्स
अफगाणिस्तान कोसळण्याच्या मार्गावर
सततची युद्धस्थिती, दहशतवाद, स्थानिक नेत्यांमधील स्पर्धा आणि दुष्काळ यामुळे अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर आहे. असा इशारा अमेरिकेने दिला आहे. उपासमार आणि कुपोषण या दोन समस्या तेथे सर्वात मोठय़ा प्रमाणात असून अमेरिकेसह जगाने याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष अंटोनिओ गुट्रेस यांनी केले. अफगाणिस्तानातील पायाभूत सेवा पूर्णतः कोलमडल्या आहेत, असे प्रतिपादन गुट्रेस यांनी केले.