वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स
कोरोना महामारी समस्येमुळे जपान आणि चीन या दोन देशामध्ये हवाई प्रवासावर निर्बंध घालण्यात आल्याने चालू वर्षाअखेरीस होणाऱया डब्ल्यूटीए आणि एटीपी टूरवरील टेनिस स्पर्धा रद्द केल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली आहे.
बिजिंगमध्ये चीन खुली तसेच टोकियोमध्ये जपान खुली पुरुष आणि महिलांची टेनिस स्पर्धा आता या निर्णयामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान डब्ल्यूटीए टूर फायनल्स टेनिस स्पर्धा चीनमधील शेनझेन या शहरामध्ये ठरलेल्या कार्यक्रमानुसार घेतली जाईल. एटीपी टूरवरील शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धा ऑक्टोबरमध्ये भरविण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. बीएनपी पेरीबस खुली टेनिस स्पर्धा इंडियन वेल्समध्ये 10 ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेपूर्वी एक आठवडा अगोदर शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धा आयोजित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. 2020 ची इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली होती. 2021 च्या टेनिस हंगामामध्ये डब्ल्यूटीए टूरवरील शिकागो महिलांची खुली टेनिस स्पर्धा 23 ऑगस्टमध्ये होणार आहे. या हंगामात ही नवी स्पर्धा घेतली जात आहे.