पेइचिंग
लडाख आणि दक्षिणेकडील चीन सागरामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन आता आपले जे-20 लढाऊ विमान अद्ययावत करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. भारतीय वायूसेनेमध्ये राफेल लढाऊ विमानांची वाढती शक्ती ही सध्या चीनची झोप उडविणारी असल्यानेच हा वेगळा विचार करुन सध्याची रणनिती चीन आखत असल्याचे संकेत आहेत. चिनी एअरफोर्स आता आपल्या ‘जे-20 स्टील्थ’ लढाऊ विमानाच्या इंजिनसाठी 2 डी थ्रस्ट वेक्टरिंग नोजल लावण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चीनकडून सध्या होत असणाऱया या बदलाचे संकेत जागतिक पातळीवर महत्वाचे ठरणार असल्याचे मानले जात आहे. चीनच्या सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘जे-20’ या लढाऊ विमानाचे उड्डाण करण्यासाठी सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून यामध्ये अत्याधुनिक बदल केला जाणार असल्याचेही ग्लोबल टाईम्सने स्पष्ट केले आहे.