सीमेवर तणाव -लक्षणीय द्विपक्षीय व्यापार – अमेरिका दुसऱया स्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीमेवर तणाव आणि मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ पुढाकारानंतरही चीनकडून होणाऱया आयातीवरील भारताची निर्भरता वाढली आहे. 2020 या वर्षात चीन अमेरिकेला मागे टाकून भारताचा पहिल्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार ठरला आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार भारत आणि चीन यांच्यात मागील वर्षी द्विपक्षीय व्यापार 77.7 अब्ज डॉलर्सचा राहिला आहे. पण हे प्रमाण 2019 च्या तुलनेत कमी आहे. 2019 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 85.5 अब्ज डॉलर्सचा राहिला होता.
महामारीमुळे मागणीत घट झाल्याने भारत आणि अमेरिका यांच्यात 75.9 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. मागील वर्षी सीमेवर हिंसक झटापटीनंतर मोदी सरकारने चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. चीनच्या अनेक मोबाइल ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही भारत अवजड यंत्रसामग्री, दूरसंचार उपकरणे आणि गृहोपयोगी उत्पादनांवर बऱयाच अंशी चीनकडून होणाऱया आयातीवर निर्भर आहे. याचमुळे 2020 मध्ये चीनसोबतच्या व्यापारात भारताची तूट सुमारे 40 अब्ज डॉलर्सची राहिली आहे.
चीनला होणारी निर्यातही वाढली
2020 मध्ये भारताची चीनकडून होणारी आयात 58.7 अब्ज डॉलर्स राहिली. अमेरिका आणि युएईकडून करण्यात आलेल्या संयुक्त आयातीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. अमेरिका आणि युएई हे भारताचे अनुक्रमे दुसऱया आणि तिसऱया क्रमांकाचे व्यापारी भागीदार आहेत. पण या कालावधीत भारत चीनकडून होणारी आयात कमी करण्यास काही अंशी यशस्वी ठरला आहे. तर भारताची निर्यात 2019 च्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढून 19 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
चिनी गुंतवणुकीचे प्रस्ताव
केंद्र सरकार चिनी कंपन्यांच्या 45 गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी देणार आहे. यात ग्रेट वॉल मोटर आणि एसएआयसी मोटर कॉर्पची गुंतवणूक सामील आहे. चिनी कंपन्यांचे दोन अब्ज डॉलर्सचे 150 गुंतवणुकीचे प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहेत. सीमेवरील तणावामुळे चीनच्या गुंतवणुकीसंबंधी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली होती. पडताळणी वाढल्याने हाँगकाँगच्या माध्यमातून येणारी जपानी आणि अमेरिकन कंपन्यांच्या गुंतवणुकीचे प्रस्तावही अडकले होते. 45 कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला सर्वप्रथम मंजुरी मिळू शकते. मंजुरी मिळणारे प्रस्ताव राष्ट्रीय सुरक्षेसाठी संवेदनशील नसलेल्या निर्मिती क्षेत्राशी संबंधित असल्याचे समजते.