भारत-न्यूझीलंड दुसरी वनडे आज : ताडमाड उंचीचा काईल जेमिसन वनडे पदार्पणासाठी सज्ज
ऑकलंड / वृत्तसंस्था
गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाच्या आघाडीवरील उणिवा पहिल्या वनडेत पूर्णपणे उघडय़ावर आल्यानंतर भारतीय संघाला आज (दि. 8) दुसऱया वनडेत त्या चुकांची दुरुस्ती करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. टी-20 मालिकेत 5-0 असा एकतर्फी विजय संपादन केल्यानंतर भारतीय संघ शब्दशः हवेत होता. पण, पहिल्या वनडेत त्यांना जमिनीवर उतरवण्याचे कर्तव्य न्यूझीलंड संघाने इमानेइतबारे पार पाडले. त्या पार्श्वभूमीवर आजची लढत दोन्ही संघांचा कस पाहणारी ठरु शकते. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 7.30 वाजता ही लढत सुरु होईल.
यापूर्वी, सेडॉन पार्कवर पहिल्या वनडेत किवीज संघाने वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचा पाठलाग नोंदवला. त्यानंतर आता तुलनेने त्यापेक्षा छोटय़ा आकाराच्या ईडन पार्कवर दोन्ही संघ आमनेसामने भिडतील, त्यावेळी नाणेफेक विशेष महत्त्वाची ठरेल. दुसऱयांदा फलंदाजी करणाऱया संघाला अर्थातच अधिक पोषक स्थिती असेल, असे प्रथमदर्शनी संकेत आहेत.
सव्याज परतफेड करण्याचे आव्हान
हॅमिल्टनमधील पराभव भारताच्या जिव्हारी लागला आहे. पण, पिछाडी भरुन काढत मुसंडी मारण्याचे कसब आपल्याकडे आहे, हे विंडीज व ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत भारताने दाखवून दिले असून या मालिकेतही विराटसेनेकडून तीच अपेक्षा आहे. विंडीजविरुद्ध चेन्नईत व ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला, त्याचीच पुनरावृत्ती हॅमिल्टनमध्ये झाली. प्रतिस्पर्धी फलंदाजांनी जोरदार हल्ले चढवले आणि भारतीय गोलंदाजांकडे त्याचे उत्तरच नव्हते.
पहिल्या वनडेत ज्या-ज्यावेळी ब्रेकथ्रू मिळवून देण्याची, विकेटस घेण्याची गरज होती, त्या-त्यावेळी विराटने जसप्रित बुमराहकडे चेंडू सोपवण्याचा सिलसिला सुरु केला. पण, बुमराहवर अति अवलंबून राहण्याचे तोटेही आता दिसून येऊ लागले आहेत. भारताचे खराब क्षेत्ररक्षण अर्थातच, चिंतेचे ठरत आले असून चेन्नई, मुंबई व हॅमिल्टन येथील पराभवात त्याचे प्रतिबिंब प्रकर्षाने उमटले आहे.
ऐच्छिक सत्रात सैनी-शार्दुलचा सराव
शुक्रवारी भारताचे ऐच्छिक सराव सत्र होते. त्यात नवदीप सैनी व शार्दुल ठाकुर यांनी गोलंदाजी तर केलीच. शिवाय, नेट्समध्ये फलंदाजीही केली. केदार जाधवची संघात नेमकी भूमिका काय आहे, हे पहिल्या वनडेतही स्पष्ट झाले नाही. वास्तविक, पार्ट टाईम फिरकी गोलंदाजीही करु शकत असल्याने समतोल साधण्यासाठी त्याला संघात घेतले जाते. पण, विराटने पहिल्या वनडेत त्याला एकही षटक दिले नाही. छोटे मैदान, हे एक कारण असू शकेल. पण, त्या निकषावर येथील मैदान आणखी छोटे आहे, हे भारतीय संघव्यवस्थापनाला विसरुन चालणार नाही.
मयांक अगरवाल व पृथ्वी शॉ सलामीला येतील, हे जवळपास स्पष्ट मानले जाते. न्यूझीलंडने टी-20 मालिकेत व्हॉईटवॉशला सामोरे जावे लागल्यानंतर पहिल्या वनडेसाठी संघाचा चेहरामोहरा बदलून टाकला आणि त्याची फलिते त्यांना मिळाली. हंगामी कर्णधार टॉम लॅथमची मध्यफळीतील उपयुक्त फलंदाजी निर्णायक ठरली. हेन्री निकोल्स, मार्टिन गप्टील सलामीलाच उतरतील, हे निश्चित आहे.
रॉस टेलर सध्या उत्तम बहरात असून आज दुसऱया लढतीतही त्याच्याकडून किवीज संघाला बऱयाच अपेक्षा असतील. नियमित कर्णधार केन विल्यम्सन अद्यापही पूर्ण तंदुरुस्त नाही तर स्कॉट कुगलाईन आजारपणामुळे दुसऱया वनडेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑकलंडचा 6 फूट 8 इंच उंचीचा काईल जेमिसन येथे वनडे पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. तो ईश सोधीच्या जागी संघात प्रतिनिधीत्व करेल.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी.
न्यूझीलंड : टॉम लॅथम ((कर्णधार, यष्टीरक्षक), मार्टिन गप्टील, रॉस टेलर, कॉलिन डे ग्रँडहोम, जिम्मी नीशम, स्कॉट कुगलाईन, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोल्स, मिशेल सॅन्टनर, मनीष बेनेट, टीम साऊदी, काईल जेमिसन.
सामन्याची वेळ : सकाळी 7.30 पासून.