इस्तंबूल / वृत्तसंस्था
मँचेस्टर सिटी व चेल्सी यांच्यातील चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील बहुचर्चित फायनल इस्तंबूलऐवजी पोर्टो येथे खेळवली जाणार आहे. युरोपियन सॉकरची गव्हर्निंग बॉडी युफाने गुरुवारी ही माहिती दिली. कोव्हिड-19 च्या रेस्ट्रीक्शन्सचे पालन करत इंग्लिश चाहत्यांना प्रवास करता यावा, यासाठी हा बदल केला असल्याचे युफाने याप्रसंगी म्हटले आहे.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ही फायनल इस्तंबूलच्या अतातूर्क ऑलिम्पिक स्टेडियमवर होणार होती. पण, तुर्कीने मागील आठवडय़ात ब्रिटनला ट्रव्हलच्या ‘रेड लिस्ट’मध्ये घातले आणि यामुळे इंग्लिश चाहते हा सामना पाहण्यासाठी तेथे पोहोचू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले. त्यानंतर सदर बदल केला गेला आहे. आता दि. 29 रोजी ही लढत एफसी पोर्टोच्या इस्तादियो डो ड्रगाओ येथे खेळवली जाईल.
मँचेस्टर सिटी व चेल्सी या दोन्ही क्लबना सदर सामन्याची प्रत्येकी 6 हजार तिकीटे मिळणार असून लवकरच त्याची विक्री सुरु केली जाऊ शकते. सामन्यासाठी किती प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल, याचा नेमका आकडा अद्याप जाहीर झालेला नाही. यापूर्वी, ही फायनल लंडनमधील वेम्बले स्टेडियमवर हलवण्याची चर्चा सुरु होती. पण, युके क्वारन्टाईनबाबत काही आवश्यक सवलती मिळत नसल्याने हा प्रस्ताव बारगळला.
पोर्तुगालचा दि. 17 मे पासून युके प्रशासनाच्या ‘ग्रीन लिस्ट’मध्ये समावेश आहे. त्यामुळे इंग्लिश क्लब्सचे चाहते हा सामना पाहण्यासाठी तेथे पोहोचू शकतात. सध्या येथे लॉकडाऊनची बंधने शिथिल केली जाणे अपेक्षित असून दि. 17 मे पासून प्रवासावरील निर्बंधही हटवले जातील, अशी शक्यता आहे.
येथील फुटबॉल चाहत्यांना तब्बल वर्षभरापासून आपल्या पसंतीच्या क्लबचे सामने लाईव्ह पाहता आलेले नाहीत. चॅम्पियन्स लीगची फायनल तर क्लब फुटबॉलचे सर्वोच्च शिखर ठरत आली आहे. चाहत्यांना हा सामना पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचा सुवर्णमध्य काढता आला, याचा आम्हाला आनंद आहे.
-युफाचे अध्यक्ष अलेक्झांडर कॅफेरिन.